सातारा - भाजपचे माण-खटाव मतदारसंघाचे उमेदवार जयकुमार गोरे यांच्या प्रचारासाठी राज्याच्या ग्राम विकासमंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत सभा होणार होती. मात्र, ऐनवेळी पंकजा मुंडे यांनी यायचे टाळल्याने मतदारसंघात चर्चांना उधाण आले आहे. पंकजा मुंडे आणि या मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार प्रभाकर देशमुख यांचे जवळचे संबंध आहेत. त्यामुळेच पंकजा मुंडेंनी या सभेला यायचे टाळल्याची चर्चा आहे.
हेही वाचा -'आता काय मतदारसंघात फिरवून विकास दाखवू का?'
माण-खटावमध्ये 10 हजारांपेक्षा जास्त वंजारी समाजाचे मतदान आहे आणि पंकजा यांच्या शब्दावर हे मतदान जयकुमार गोरेंच्या पारड्यात गेले असते. मात्र, त्यांनी या सभेला यायचे टाळल्याने गोरेंना पंकजा मुंडेंचा पाठिंबा नसल्याच्या चर्चा साताऱ्यात रंगू लागल्या होत्या. मात्र, पंकजा मुंडे यांनी व्हिडिओ तयार करून माण खटावचे महायुतीचे उमेदवार जयकुमार गोरे यांना विजयी करा, असे आवाहन मतदारांना केले आहे. मी त्यांच्यासाठी सभा घेण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, माझ्या न येण्याचा चुकीचा अर्थ लावू नये, इतर ठिकाणच्या सभांमध्ये मी अडकून पडलो आहे. तरी माझा संदेश तुमच्यापर्यंत पोहोचत आहे. आपण आमदार गोरे यांच्या सोबत उभे राहावे, असा संदेश त्यांनी सोशल मीडियावरून दिला आहे.
त्यावर गोरे यांनी पंकजा मुंडेंचे आभार मानले आहेत. पंकजा मुंडेचा तो व्हिडिओ शेअर करत, 'पंकजाताई गोपीनाथराव मुंडे यांनी माण-खटावच्या जनतेला भाजपचे अधिकृत उमेदवार म्हणून मला मतदान करण्याचे आवाहन केले, ताईंचे मनापासून आभार', असे म्हटले आहे.