महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पालीच्या खंडोबाची आजपासून यात्रा; महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश, कर्नाटकमधील भाविक दाखल - Pali Khandoba Yatra to start from Wednesday

महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि कर्नाटक राज्यातील लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या पाली (ता. कराड) येथील खंडोबा यात्रेला आजपासून (बुधवार) सुरूवात होत आहे. तारळी नदीकाठी लाखो भाविकांच्या साक्षीने मल्हारी-म्हाळसा यांचा विवाह सोहळा पार पडणार आहे.

Pali Khandoba Yatra to start from Wednesday
पालीच्या खंडोबाची आजपासून यात्रा; महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश, कर्नाटकमधील भाविक दाखल

By

Published : Jan 8, 2020, 1:53 AM IST

सातारा - महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि कर्नाटक राज्यातील लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या पाली (ता. कराड) येथील खंडोबा यात्रेला आजपासून (बुधवार) सुरूवात होत आहे. तारळी नदीकाठी लाखो भाविकांच्या साक्षीने मल्हारी-म्हाळसा यांचा विवाह सोहळा पार पडणार आहे. यात्रेसाठी पाल नगरी सज्ज झाली असून प्रशासनाने यात्रेची जय्यत तयारी केली आहे.

संभाव्य धोके टाळण्यासाठी प्रशासन सज्ज..

वाई तालुक्यातील मांढरदेवी यात्रेतील चेंगराचेंगरीनंतर प्रशासनाने मोठ्या यात्रांच्या व्यवस्थापनात अनेक बदल केले आहेत. संभाव्य धोका टाळण्यासाठी जुन्या चालीरिती आणि परंपरांमध्ये प्रशासनाने देवस्थान समितीला विश्वासात घेऊन बदल सुचविले. त्या बदलांचा स्वीकार करून पालीच्या मार्तंड देवस्थानने यात्रा साजरी करण्यास सुरूवात केली आहे. या यात्रेच्या निमित्ताने पाल देवस्थान समितीने स्वत:च्या मालकीचा रथ तयार केला आहे.

काय आहे या यात्रेचे आणि गावाचे वैशिष्ट्य..?

सुमारे 10 हजाराच्या आसपास लोकसंख्या असणारे पाल हे कराड तालुक्यातील मोठे गाव आहे. खंडेरायाचा विवाह सोहळा हे पाली यात्रेचे वैशिष्ट्य आहे. इ. स. 1024 मध्ये विजयनगरच्या राज्यात हे गाव वसले होते. गावची यात्रा असो वा दसरा, चंपाषष्ठी, खंडेनवमी किंवा इतर कोणतेही सण इथे दिमाखात साजरे होतात. मार्तंडभैरव म्हाळसादेवीचे स्थान इथल्या शंभोघळीत आहे. जवळच डोंगरमाथ्यावर मिरजेच्या मीरासाहेबांचा दर्गा आहे. पश्चिमेस विंध्यवासिनी डोंगरावर इजाईदेवी, वाग्देवी, चांभारीचा नाईकबा आणि दक्षिणेस शंभू महादेवाचे मंदीर आहे. गावाच्या उत्तरेला तारळी नदीकाठी पूर्वामुखी म्हाळसा व मार्तंड विवाहासाठी मंडप आहे. महालक्ष्मी, महामारी व म्हसोबा अशी अनेक देव-देवतांची मंदिरे नदीच्या पूर्वेकडे आहेत. खंडोबा मंदीराची आणि मंदीराच्या शिखराची बांधणी ही विजयनगर स्वराज्यावेळची आहे. दाक्षिणात्य शिल्प व वास्तुकलेचा उत्कृष्ट संगम या मंदीराच्या बांधणीत आढळून येतो. या यात्रेच्या निमित्ताने पाल नगरीत 'येळकोट.. येळकोळ.. जय मल्हार'चा जयघोष सुरू झाला आहे.

असा संपन्न होईल विवाह सोहळा..

बुधवारी दुपारी दोनच्या सुमारास मार्तंड व म्हाळसा यांच्या मूर्तीची मुख्य मानकरी पूजा करतील. त्यानंतर दोन्ही मूर्तींना पालखीत ठेवून त्यांना तारळी नदीपात्रातून सायंकाळी 5.30 च्या सुमारास बोहल्याकडे आणले जाईल. रीतीरिवाजाप्रमाणे ‘येळकोट येळकोट जय मल्हार’च्या जयघोषात खंडेरायाचा विवाह सोहळा संपन्न होईल.

हेही वाचा : "जर हवा असेल सात बारा कोरा तर उद्या महाराष्ट्र बंद करा"

ABOUT THE AUTHOR

...view details