सातारा- अलीकडच्या काळातील गतीमानतेमुळे माणसांचं जगणं कवडीमोल होत असताना प्राण्यांचा विचार न केलेलाच बरा. मात्र, अशाही अवस्थेत जिल्ह्यातील पुसेगाव (ता. खटाव) येथील बैल बाजारात सातार्याच्या एका खिल्लार बैलजोडीला एक नव्हे, दोन नव्हे, तब्बल 11 लाख रुपये इतकी विक्रमी किंमत मिळाली आहे.
साताऱ्याच्या बैलजोडीची विक्रमी 11 लाखांना विक्री साताऱ्यातील प्रसिद्ध बैल व्यापारी व शाहूपुरी ग्रामपंचायतीचे उपसरपंच राजुशेठ गिरी यांच्याकडील सोन्या आणि राजा या बैलजोडीला ही किंमत मिळाली आहे. पुण्यातील प्रगतशील शेतकरी, उद्योजक सागर टिळेकर यांनी ही बैलजोडी खरेदी केली आहे. त्यांनी वाजत-गाजत, मिरवणूक काढून ही बैलजोडी नेली.
साताऱ्याच्या बैलजोडीची विक्रमी 11 लाखांना विक्री पुसेगाव येथे श्री सद्गुरू सेवागिरी महाराज रथ उत्सव यात्रा सध्या सुरू आहे. रथ उत्सव व बैल बाजार हे या यात्रेचे ठळक वैशिष्ट्य मानले जाते. खिलार जनावरांच्या खरेदी-विक्रीसाठी दरवर्षी महाराष्ट्र व कर्नाटकातून मोठ्या प्रमाणात शेतकरी वर्ग येतो. या बाजारात राजुशेठ गिरी यांच्याकडील सोन्या आणि राजा या बैलजोडीने संपूर्ण बैल बाजाराला भुरळ पाडली होती. या बैलांना बघण्यासाठी तसेच त्यांच्या सोबत फोटो घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी होत होती.
या बैलजोडीबद्दल बोलताना मालक राजुशेठ गिरी यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना म्हटले, की या वर्षी देहू ते पंढरपूर दरम्यान तुकाराम महाराजांची पालखी ओढण्याचा मान या बैलजोडीला मिळाला होता.
सातारा जिल्ह्यातील पुसेगाव (ता. खटाव) येथील यात्रा पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख यात्रांपैकी एक समजली जाते. पुसेगावच्या या बैलबाजारात बैलांच्या खरेदी विक्रीतून दरवर्षी कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते.