सातारा: पती तुरुंगात असल्याने आर्थिक गरजेसाठी एका आईने पोटच्या मुलीची विक्री केली. एक वर्षाच्या मुलीला आईकडून विकत घेतल्याचा आरोप असलेल्या साताऱ्यातील महिलेला जामीन मंजूर करतानाच न्यायालयाने एक निर्णय दिला. गेल्या वर्षी अश्विनी बाबर या महिलेला साताऱ्यात अटक झाली होती. अश्विनी आणि तिच्या नवऱ्यावर एका लहान मुलीला विकत घेतल्याचा आरोप आहे. बाबर दाम्पत्याकडून मुलीच्या आईने पैसे घेतले होते. ती रक्कम परत करून मुलीचा हक्क मागितला, पण बाबर दाम्पत्याने मुलीचा ताबा देण्यास नकार दिला. महिलेने पोलिसांत तक्रार दिल्यानंतर बाबर दाम्पत्याने मुलीला तिच्या आईकडे सोपवले.
न्यायमूर्तींनी व्यक्त केल्या वेदना: या प्रकरणात अश्विनी बाबर हिने जामिनासाठी अर्ज केला होता. जामीन अर्जावर सुनावणी होऊन उच्च न्यायालयाने महिलेचा जामीन अर्ज मंजूर केला. यासंदर्भातील निर्णय देताना न्यायमूर्ती एस. एम. मोडक यांनी टीपण्णी केली. २१ व्या शतकात मुलीला वस्तू मानून आर्थिक फायद्यासाठी माध्यम म्हणून वापरले जाते. नैतिकता आणि मानवी हक्कांच्या तत्त्वानुसार हे अत्यंत आक्षेपार्ह आहे. विक्री शब्द वापरतानाही अत्यंत वेदना होत आहेत. या प्रकारात तर या मुलीच्या आईनेही विक्री केल्याचे म्हटले आहे.