कराड (सातारा)- कृष्णा कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीची रणधुमाळी सध्या सुरू आहे. निवडणुकीसाठी दाखल झालेल्या अर्जांची छाननी झाली. त्यामध्ये माजी मंत्री पतंगराव कदम यांचे बंधू तथा सहकार राज्यमंत्री विश्वजीत कदम यांचे चुलते रघुनाथ कदम यांच्यासह तब्बल 22 जणांचे अर्ज अवैध ठरले. अवैध ठरलेल्या अर्जांमध्ये कराड तालुक्यातील 13, वाळवा तालुक्यातील 4 आणि कडेगाव-पलूस तालुक्यातील 5 अर्जांचा समावेश आहे.
कृष्णा कारखाना निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. 21 जागांसाठी ही निवडणूक होत आहे. निवडणुकीसाठी दाखल झालेल्या अर्जांची बुधवारी (दि. 2 जून) छाननी झाली. छाननीमध्ये तब्बल 22 अर्ज अवैध ठरले. कृष्णा कारखान्याच्या संचालक मंडळाला आणखी मुदतवाढ न देता तातडीने निवडणूक घ्यावी, अशा मागणीची याचिका उच्च न्यायालयात दाखल करणार्या संस्थापक पॅनेलच्या डॉ. अजित देसाई व त्यांच्या पत्नीचाही अर्ज अवैध ठरला आहे.
21 जागांसाठी 305 अर्ज
कृष्णा कारखान्याच्या 21 जागांसाठी एकूण 305 अर्ज दाखल झाले होते. त्यातील 70 जणांचे दुबार अर्ज निवडणूक निर्णय अधिकार्यांनी रद्द ठरविले. तीन हरकतीही दाखल झाल्या होत्या. त्याही फेटाळल्या गेल्या आहेत. छाननीच्या निकषानुषार 22 अर्ज अवैध ठरले आहेत. 213 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. छाननी प्रक्रिया पार पडल्यानंतर आता अर्ज मागे घेणाऱ्यांकडे सभासदांचे लक्ष लागलेले आहे.
निवडणूक दुरंगी की तिरंग अद्याप अस्पष्ट
यंदाच्या निवडणुकीत सत्ताधारी भाजपचे डॉ. सुरेश भोसले यांच्या सत्तेला आव्हान देण्यासाठी माजी अध्यक्ष अविनाश मोहिते (संस्थापक पॅनेल-राष्ट्रवादी) आणि डॉ. इंद्रजीत मोहिते (रयत पॅनेल-काँग्रेस) यांच्या एकत्रिकरणासाठी गेल्या अनेक दिवसांपासून नेत्यांचे प्रयत्न सुरू आहेत. तथापि, चर्चेच्या फेर्याच सुरू आहेत. अंतिम तोडगा अद्याप निघालेला नाही. त्यामुळे निवडणूक दुरंगी होणार की तिरंगी, याबद्दलचे चित्र अद्याप अस्पष्ट आहे.
हेही वाचा -कराडच्या प्राध्यापकांनी लावला गवत कुळातील नव्या प्रजातीचा शोध