सातारा - सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी 31 डिसेंबर रोजी आयोजित केलेले कार्यक्रम रात्री 10 वाजताच बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी शेखर सिंह यांनी दिले आहेत. जिल्ह्यातील हॉटेल, रेस्टॉरंट व धाबे रात्री 11 वाजताच बंद करण्याचेही आदेशात म्हटले आहे.
31 डिसेंबरला नव वर्षाची सर्व कार्यक्रमे रात्री 10 ला बंद करण्याचे आदेश पर्यटकांची पावले महाबळेश्वरकडे
मावळत्या वर्षाला निरोप देत नववर्षाचे स्वागत करण्यासाठी थंड हवेचे ठिकाण असलेल्या महाबळेश्वर व पाचगणी येथे दरवर्षी लाखो पर्यटक येतात. यानिमित्ताने हॉटेल्स, रेस्टॉरंट, फार्म हाऊस, लॉज आदी ठिकाणी पार्ट्या, भरगच्च मनोरंजनपर कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. मध्यरात्री उशिरापर्यंत हे कार्यक्रम चालतात. कोरोना साथरोगाच्या पार्श्वभूमीवर महानगरांमध्ये रात्रीच्या वेळी कर्फ्यू लावल्याने थर्टीफस्ट साजरा करण्यासाठी महानगरातील नागरिकांची पावले पाचगणी-महाबळेश्वरकडे वळली आहेत.
31 डिसेंबरच्या रात्री 10 नंतर मनाई
सलग सुट्ट्यांमुळे मोठ्या संख्येने पर्यटक महाबळेश्वर, पाचगणीत दाखल झाले आहेत. महाबळेश्वर व पाचगणी या ठिकाणी 31 डिसेंबरच्या सर्व कार्यक्रमांना रात्री 10 वाजल्यानंतर चालू ठेवण्यास सक्त मनाईचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी निर्गमित केले आहेत. कोरोनाच्या अनुषंगाने विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी, तसेच कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने रात्री १० नंतर दोन्ही शहरांमध्ये जमावबंदी आदेश लागू करण्यात आला आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.
हेही वाचा -देहविक्रयासाठी आणलेल्या दोन महिलांची सुटका ; वाईतील लॉजवर छापा
सातारा जिल्ह्यातीत हॉटेल, रेस्टॉरंट व धाबे क्रिमिनल प्रोसिजर कोड 1973 चे कलम 144 मधील तरतुदीनुसार रात्री 11 नंतर चालू ठेवण्यास सक्त मनाईचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आहेत. हा आदेश आजपासून पुढील आदेश येईपर्यंत लागू असेल. तसेच, राष्ट्रीय महामार्गावर असणारे हॉटेल, रेस्टॉरंट, धाबे यांना आदेशातून वगळण्यात आले आहे. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशात म्हटले आहे.
हेही वाचा -अखेर 16 लाखांचा बकरा सापडला, तिघांना अटक