महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jul 14, 2020, 10:32 PM IST

ETV Bharat / state

संशयित आरोपीला मदत करणारा पोलीस कर्मचारी निलंबित, दोन उपनिरीक्षकांची मुख्यालयी बदली

बोगस सैन्य भरती प्रकरणातील संशयित आरोपी आकाश डांगेला मदत केल्याप्रकरणी जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी फलटण शहर पोलीस ठाण्यातील कर्मचारी साहील झारी याला निलंबित केले आहे. तर पोलीस उपनिरीक्षक बनकर व शेख यांची मुख्यालयी बदली करण्यात आली आहे.

faltan police station
फलटण पोलीस ठाणे

सातारा -बोगस सैन्य भरती प्रकरणातील संशयित आरोपी आकाश डांगेला मदत केल्याप्रकरणी जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी फलटण शहर पोलीस ठाण्यातील कर्मचारी साहील झारी याला निलंबित केले आहे. शहर फलटण शहर पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक संदीप बनकर व फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक शेख याची सातारा पोलीस मुख्यालयात बदली करण्यात आली आहे.

भारतीय सैन्य दल तसेच नौदलामध्ये भरतीचे आमिष दाखवून भाडळी (फलटण) येथील आकाश काशिनाथ डांगे, तसेच बारामती (जि. पुणे) येथील नितीन जाधव यांनी राज्यातील शेकडो युवकांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घातला होता. याप्रकरणी पुणे ग्रामीण पोलीस हद्दीमध्ये या दोघांविरोधात फसवणुकीचे गुन्हे दाखल झाले होते.

गेल्या चार महिन्यांपासून फलटण तसेच बारामती तालुक्यामध्ये बोगस सैन्य भरती रॅकेटच्या मोठा सुळसुळाट उठला होता. 19 जून रोजी आकाश डांगे व बारामती येथील नितीन जाधव या दोघांच्या विरोधात भिगवण (ता. इंदापूर, जि. पुणे) पोलीस ठाण्यामध्ये फसवणुकीचे गुन्हे दाखल झाले. यानंतर पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी तत्काळ आकाश डांगे व नितीन जाधवला अटक करण्याचे आदेश पुणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेला दिले होते. त्यानंतर गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पदमाकर घनवट यांनी आकाश डांगे व नितीन जाधवच्या मुसक्या आवळल्या होत्या.

पोलीस तपासामध्ये आकाश व नितीनला फलटण शहर पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक संदीप बनकर तसेच पोलीस शिपाई साहील झारी व फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक शेख यांनी मदत केल्याचे निदर्शनास आले होते. याप्रकरणी सातारा जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी पोलीस उपनिरीक्षक बनकर व शेख यांची तडकाफडकी मुख्यालयात बदली केली असून पोलीस शिपाई साहील झारी याला निलंबित केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details