कराड (सातारा) - जीमला निघालेला दुचाकीस्वार तरूण अज्ञात वाहनाच्या धडकेत जागीच ठार झाला. कराड-पाटण मार्गावरील विजयनगर (ता. कराड) येथे बुधवारी पहाटे ही घटना घडली. हणमंत भीमसेन ईटकर (वय 27) असे मृत तरूणाचे नाव आहे. दरम्यान, कराड-पाटण मार्गावर दाट धुके होते. त्यामुळे हा अपघात झाल्याची चर्चा आहे. या अपघाताची नोंद कराड शहर पोलीस ठाण्यात झाली आहे.
हणमंत ईटकर हा तरूण विवाहित असून त्याच्या पश्चात पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी आहे. तो गवंडी काम करतो. कर्नाटकातील उडपी परिसरात तो काम करत होता. काही दिवसांपुर्वीच तो विजयनगरमधील बालाजी कॉलनीत आपल्या कुटुंबीयांकडे आला होता. तसेच दोन दिवसांपासून तो विमानतळ-मुंढे येथील जीमला जात होता.