सातारा- एसटी आणि मोटरसायकलच्या अपघातात मोटरसायकलवरील एक ठार आणि एक जण जखमी झाल्याची घटना आज (शनिवार) दुपारी कराड-चिपळूण मार्गावर वसंतगड (ता. कराड) येथे घडली. दरम्यान, अपघातानंतर जमावाने एसटी रस्त्यातच अडवून ठेवल्यामुळे वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. कराड तालुका पोलिसांनी घटनास्थळी जाऊन परिस्थिती नियंत्रणात आणत वाहतूक सुरळीत केली.
कराडहून तांबवेकडे निघालेली एसटी (क्र. एम. एच. 14 बी. टी. 0346) ही वसंतगड हद्दीत पोहचल्यानंतर एसटी आणि मोटरसायकलचा अपघात झाला. अपघातानंतर मोटरसायकलवरील अभिजीत नंदकुमार कुकडे (वय 25) आणि जगदीश शशिकांत जाधव (वय 45, दोघे रा. मल्हारपेठ, ता. पाटण) हे रस्त्यावर पडून गंभीर जखमी झाले. जगदीश जाधव यांना कृष्णा रुग्णालयात आणि अभिजीत कुकडे यास सह्याद्री रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, अभिजीत कुकडे या युवकाचा मृत्यू झाला, तर जगदीश जाधव यांच्यावर उपचार सुरू आहेत. अपघाताची नोंद कराड तालुका पोलीस ठाण्यात झाली आहे.
हेही वाचा - दोन मुलांसह महिलेची कोयना नदीत आत्महत्या, एका बालकाचा मृतदेह सापडला