सातारा- 'राजा हा राजा आहे, त्याला कोण पुरावा मागणार त्याला पुरावा मागू नका, हे प्रजा म्हणून आम्ही कसे म्हणणार? तरीही राजाला पुरावा मागितलाच आहे तर त्यांनी तो द्यावा; विषय संपला', अशा शब्दात माजी आमदार, 'उपरा'कार लक्ष्मण माने यांनी प्रतिक्रिया व्यक्त करत राजघराण्यासंदर्भातील वादात उडी घेतली.
राजाला पुरावा मागितलाच तर त्यांनी तो द्यावा - लक्ष्मण माने
भारत सरकार सगळ्यांनाच सीएएद्वारे पुरावे मागत आहे. तो महाराजांनाही मागितला जाईल आणि मलाही मागितला जाईल. जर महाराष्ट्र शासनाने हा कायदा राज्यात लागू केला तर मला आणि संपूर्ण प्रजेला नागरिकत्व सांगणारा पुराव्याचा कागद घेऊनच पळावे लागेल, अशी टीका माजी आमदार लक्ष्मण माने यांनी सीएए, एनआरसी कायद्यावरून सरकारवर केली.
छत्रपती शिवाजी महाराज व पंतप्रधान मोदी यांच्यातील तुलनेवरुन निर्माण झालेल्या वादाने वेगळे वळण घेतले आहे. खासदार राऊत यांच्या निषेधार्थ गुरुवारी साताऱ्यात बंद पाळण्यात आला. या पार्श्वभूमीवर ते बोलत होते. माने म्हणाले, खासदार संजय राऊत यांनी राजघराण्यातील वंशजांना पुरावा मागितला तर त्यात चुकीचे काय आहे. पुरावा मागितला म्हणजे दिलाच पाहिजे अस तर काही ना. दोघे परस्परांवर बोलत आहेत, त्यांचा आपसातचा हा वाद आहे. राजाला पुरावा मागू नका, हे प्रजा म्हणून आम्ही कसे म्हणणार, राजाला कोण पुरावा मागणार? पण, मागितला तर राजाने तो द्यावा. छत्रपती शिवाजी महाराजांपर्यंत चर्चा नेण्याची काहीच आवश्यकता नाही. त्यांचे तुम्हीं वारसदार आहात की नाही यात काहीत प्रश्न नाही. जर राऊतांनी तो प्रश्न विचारला तर त्याचे उत्तर देऊन विषय संपवून टाकावा, असे माने म्हणाले.
तुमच्या दोघांच्या भांडणात आम्हाला काहीही रस नाही. राजा भांडत असेल तर भांडू दे, प्रजेला या वादात काहीही रस नाही. भारत सरकार सगळ्यांनाच सीएएद्वारे पुरावे मागत आहे. तो महाराजांनाही मागितला जाईल आणि मलाही मागितला जाईल. महाराष्ट्र शासनाने हा कायदा लागू करणार नाही, असे सांगितले आहे. पण, हा कायदा राज्यात लागू झाल्यास तुम्हाला, मला आणि संपूर्ण प्रजेला नागरिकत्व सांगणारा पुराव्याचा कागद घेऊनच पळावे लागेल, अशी टीकाही लक्ष्मण माने यांनी सीएए, एनआरसी कायद्यावरून सरकारवर केली.