माण (सातारा) -तालुक्यातील भालवडी येथे होम क्वारंटाईन करण्यात आलेल्या एका वयोवृद्ध व्यक्तीचा रविवारी सायंकाळी मृत्यू झाला. यानंतर आरोग्य विभागाने रविवारी रात्री उशिरा मृत व्यक्तीचे कोरोना स्वॅब तपासणीसाठी पाठवले. यानंतर सोमवारी दुपारी मृतदेह पुन्हा दहिवडीत आणल्यानंतर दहिवडी नगरपंचायतीने 'त्या' वृध्दाच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले.
भालवडी येथील वृद्ध पति-पत्नी, त्यांचा मुलगा आणि सून मुंबई येथून शुक्रवारी 22 मेला भालवडी या मूळ गावी आले होते. यानंतर प्रशासनाने संबंधित कुटुंबातील सर्व व्यक्तींना होम क्वारंटाईन केले होते. मात्र, गावी आल्यानंतर दोनच दिवसात यातील वृद्ध व्यक्तीचा रविवारी अचानक मृत्यू झाला. मृत व्यक्ती तीन महिन्यापासून काविळच्या आजाराने त्रस्त होती. तसेच सततच्या आजारामुळे गेल्या आठवड्यापासून पुरेसा आहार न घेतल्याने प्रकृती खालावून मृत्यू झाल्याचे मृत व्यक्तीच्या मुलाने ग्रामस्थांना सांगितले.
हेही वाचा -अखेर बीकेसीतील एक हजार खाटांचे 'कोविड रुग्णालय' सुरू..
मुंबईहून आलेल्या वृद्धाचा अचानक मृत्यू झाला, अशी माहिती सरपंच सुनीता पवार आणि पोलीस पाटील देवेंद्र बनसोडे यांनी आरोग्य विभागास दिली. त्यानंतर मृत व्यक्ती मुंबईहुन आल्यामुळे मृतदेह कोरोना तपासणीसाठी फलटण येथील शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. कोडलकर यांनी याबाबतचे आदेश दिले. शासकीय रुग्णवाहिकेतून शव वाहतूक करता येत नसल्याने डॉ. कोडलकर यांनी खासगी रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली. त्यानंतर रविवारी रात्री स्वॅब तपासणीसाठी मृतदेह फलटणला आणण्यात आला. यानंतर सोमवारी तेथील शासकीय रुग्णालयात या मृत व्यक्तीचे स्वॅब नमुने घेण्यात आले.
यानंतर गावातील आणि कुटुंबातील लोकांचा मृत व्यक्तीशी होणारा संपर्क टाळण्याच्या दृष्टीने दहिवडीतच अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय माणच्या महसूल, आरोग्य व पोलीस प्रशासनाने घेतला. त्यानंतर सोमवारी दुपारी दहिवडी स्मशानभूमीत त्या वृद्धावर अंत्यसंस्कार करण्यात आले.