सातारा - एका मूकबधिर वृद्धेवर युवकाने बलात्कार केल्याची घृणास्पद घटना घडली आहे. बोरगाव पोलिसांनी तात्काळ संशयित युवकास अटक केली. सूरज दत्तात्रेय पवार (वय - 30)असे त्याचे नाव आहे.
नागठाणे परिसरातील एका गावातील वृद्ध मूकबधिर महिलेवर अत्याचार झाल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ.सागर वाघ यांना मिळाली. डॉ.सागर वाघ, उपनिरीक्षक वर्षा डाळींबकर यांनी मूकबधिर व्यक्तींची भाषा जाणणाऱ्या एका शिक्षिकेला सोबत घेऊन घटनास्थळ गाठले.
अत्याचारग्रस्त मूकबधिर वृद्ध महिला भाऊ व आईसोबत राहते. बुधवारी दुपारी ही महिला तिच्या घरातील पडवीत झोपली होती. यावेळी सूरज पवारने तिच्यावर अत्याचार केल्याची माहिती पीडित वृद्धेने दिली. वृद्धेने यावेळी आरडाओरडा करण्याचा प्रयत्न केल्याने शेजारील महिला मदतीसाठी धावत आली. हे पाहून आरोपीने त्या ठिकाणाहून पळ काढला.
या घटनेची तक्रार गुरुवारी रात्री बोरगाव पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली असून रात्री उशिरा पोलिसांनी सूरज पवार याला अटक केली आहे.