महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सातार्‍याचे पालकमंत्री शंभूराज देसाईंविरोधात अश्लिल पोस्ट; शिंदे गटाच्या तालुका प्रमुखास जामीन

Minister Shambhuraj Desai : उत्पादन शुल्क मंत्री तथा साताऱ्याचे पालकमंत्री यांच्या विरोधात अश्लील पोस्ट केल्याप्रकरणी शिवसेनेच्या (शिंदे गट) कराड तालुका प्रमुखास पोलिसांनी अटक केली होती. न्यायालयाने त्याला आज सोमवारी जामीन मंजूर केला आहे.

Minister Shambhuraj Desai
शंभूराज देसाई

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 8, 2024, 7:37 PM IST

Updated : Jan 8, 2024, 7:56 PM IST

सातारा Minister Shambhuraj Desai : ठाणे, सातार्‍याचे पालकमंत्री, राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री आणि मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय असलेल्या शंभूराज देसाई यांच्या संदर्भात शिवसेनेच्या (शिंदे गट) कराड तालुका प्रमुखाने सोशल मीडियावर अश्लिल पोस्ट केल्यामुळं सातारा जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी काकासाहेब जाधव याच्या विरोधात कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला होता. न्यायालयात हजर केलं असता न्यायालयाने त्याची जामीनावर सुटका केली. पालकमंत्री शंभूराज देसाई हे मुख्यमंत्र्यांना चुकीची माहिती देऊन त्यांची फसवणूक करत असल्याचा आरोप करत शिंदे गटाच्या तालुका प्रमुखाने सोशल मीडियावर अश्लील पोस्ट केली होती. दोन्ही एकाच गटाचे असल्यानं साताऱ्यात शिंदे गटामध्ये सुरू असलेली धुसफुस यानिमित्तानं बाहेर आल्याची चर्चा जोर धरु लागली आहे.



पदाधिकार्‍याच्या पोस्टमुळे शिंदे गटात खळबळ : शिवसेनेचा (शिंदे गट) कराड तालुका प्रमुख काकासाहेब जाधव यांनी व्हॉटस्अप ग्रुपवर रविवारी पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या संदर्भात अश्लिल पोस्ट केली होती. तसंच ग्रुप चॅटींगमध्ये त्यांनी पालकमंत्री शंभूराज देसाई हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना चुकीची माहिती देऊन फसवत असल्याचं पोस्टमध्ये म्हटलं होतं. त्यामुळं शिंदे गटात एकच खळबळ उडाली. या पोस्टची माहिती पदाधिकार्‍यांच्या मार्फत पालकमंत्र्यांपर्यंत देखील पोहोचली. त्यानंतर काकासाहेब जाधव या पदाधिकार्‍याच्या अडचणी वाढल्या.


शिंदे गटाच्या तालुकाप्रमुखावर गुन्हा दाखल: कराड तालुक्यातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा व्हॉटस्अ‍ॅपवर शिवसेना एकनाथ शिंदे नावाचा ग्रुप आहे. त्या ग्रुपवर पालकमंत्र्यांविरोधात शिवसेनेचे तालुकाप्रमुख काकासाहेब जाधव यांनी केलेल्या अश्लिल शेरेबाजीनंतर शिंदे गटात खळबळ उडाली. ग्रुपवरील चॅटींगमध्ये त्यांनी पालकमंत्र्यांना शिवीगाळ केली. ग्रुपमधील महिला पदाधिकार्‍यांना लज्जा उत्पन्न होईल, असे शब्द वापरुन पालकमंत्री शंभूराज देसाईंची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी गुलाबराव शिंदे यांनी काकासाहेब जाधव यांच्या विरोधात कराड शहर पोलीसात फिर्याद दाखल केली. त्यानुसार काकासाहेब जाधव याच्यावर गुन्हा दाखल होऊन त्याला अटक झाली. न्यायालयाने आज जामीन मंजूर केला आहे.



अनेक घटनांमुळे पालकमंत्री ठरले वादग्रस्त: राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री आणि साताऱ्याचे पालकमंत्री असलेल्या शंभूराज देसाईंच्या संदर्भात अनेकदा वादाच्या घटना घडल्या आहेत. पालकमंत्र्यांच्या घरासमोर आत्मदहनाचा प्रयत्न, पत्रकार परिषदेला वेळेवर न येणं, पत्रकार परिषदेत पत्रकारांशी उध्दट वर्तन, पत्रकारांनी टाकलेला बहिष्कार, उध्दव ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखाने सर्किट हाऊसमध्ये पत्रकार परिषद घेऊन केलेल्या टीकेनंतर सर्किट हाऊसच्या वापरावर निर्बंध लादणं, अधिकार्‍यांना अर्वाच्च बोलणं, अशा घटनांमुळं शंभूराज देसाई सतत वादग्रस्त ठरले आहेत.

हेही वाचा -

  1. आता आमचा योग्य पद्धतीनं सुखाचा संसार सुरू झाला: शंभूराज देसाई असं का म्हणाले?
  2. ठाकरे आणि राऊत यांच्या वक्तव्यांची चौकशी करणार - मंत्री शंभूराज देसाई
  3. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीची आज पत्रकार परिषद, जागा वाटपाचा तिढा सुटणार?
Last Updated : Jan 8, 2024, 7:56 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details