सातारा - धनगरवाडी (ता. खंडाळा) ग्रामपंचायतीत मतदारांनी उमेदवारांऐवजी 'नोटा'ला अधिक पसंती दिली. उमेदवारांना नाकारून 'नोटा'ला पसंती देण्याचा प्रकार ग्रामपंचायत निवडणुकीत जिल्ह्यात प्रथमच घडला. अखेर 'नोटा'नंतर सर्वाधिक मते मिळालेले उमेदवार विजयी घोषित करण्यात आले.
उमेदवारांपेक्षा ‘नोटा’च श्रेष्ठ; खंडाळ्यात सर्वाधिक मतांचा उमेदवार विजयी घोषित - मतदारांची नोटाला पसंती
उमेदवारांपेक्षा 'नोटा'ला सर्वाधिक मतदारांची पसंती असल्याचे खंडाला तालुक्यातील एका ग्रामपंचायतीत दिसून आले. प्रशासनाने निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार नोटानंतर दुसऱ्या क्रमांकाचे मते मिळवणाऱ्या उमेदवारास विजयी घोषित केले.
दोन जागा रिक्त -
खंडाळा तालुक्यातील ५७ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक झाली. त्यातील सात ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या. ५० ग्रामपंचायतींसाठी मतदान झाले होते. मतमोजणीत धनगरवाडी ग्रामपंचायतीत ग्रामस्थांनी 'नोटा'लाच पसंती दिल्याचे मतमोजणीत दिसून आले. या ग्रामपंचायतीत सात जागा असून, तीन जागा यापूर्वीच बिनविरोध झाल्या होत्या. दोन जागांवर अर्ज न आल्याने त्या रिक्त राहिल्या आहेत.
दोन जागांसाठी झाले मतदान -
उर्वरित दोन जागांसाठी निवडणूक प्रक्रिया झाली. त्यामध्ये ग्रामस्थांनी 'नोटा'ला अनुक्रमे २११ व २१७ असे मतदान केले. या वॉर्डमध्येच जयवंत पिराजी मांढरे यांना १९, तर ज्ञानेश्वर निवृत्ती पाचे यांना १३८ मते पडली. या दोन्ही उमेदवारांपेक्षा 'नोटा'ला सर्वाधिक २११ मते पडली. या वॉर्डमध्येच सर्वसाधारण स्त्री राखीव गटात चंद्रभागा भगवान कदम यांना १२५, तर चैत्राली रामदास कदम यांना २६ मते पडली.
या दोन्ही जागेसाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले चारही उमेदवार लोकांना पसंत नव्हते. त्यामुळे नोटाला अधिक मतदान केल्यास २०१८ च्या एका निकालानुसार हे उमेदवार बाद ठरतील, असा कयास बांधून ग्रामस्थांनी नोटाचा पर्याय स्वीकारला असावा. निवडणुकीत उमेदवार पसंतीचे नसतील तर काय होऊ शकते, याचे उदाहरण समोर आले आहे. वाटलं म्हणून उभा राहिलो, अशी मानसिकता उमेदवारांची असेल तर लोकांसमोर निवडणूक आयोगाने पर्याय निर्माण करून दिला आहे. लोक त्याचा प्रभावीपणे वापर करु लागले आहेत, हे अधिक महत्त्वाचे आहे.