सातारा - २०१९ च्या या विधानसभा निवडणुकीत शिवसेना एक विचार घेऊन चालली आहे. हा महाराष्ट्र दुष्काळमुक्त कर्जमुक्त, बेरोजगारमुक्त, गुन्हेगारीमुक्त करायचा आहे. लोकांना रोजगार देत हा महाराष्ट्र संपन्न व समृध्द बनवायचा आहे. यासाठी सर्वांनी यात सहभागी व्हावे. याची सुरुवात माण खटावमधून शेखर गोरेंना मोठ्या मताधिक्क्याने निवडून देऊन करावी, असे आवाहन शिवसेना उपनेते व कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष नितीन बानगुडे पाटील यांनी केले आहे.
माण खटाव रहिवासी संघ मुंबई आयोजित माण मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार शेखर गोरे यांच्या प्रचारार्थ कळंबोली येथे मेळावा संपन्न झाला. यावेळी बानुगडे पाटील बोलत होते. यावेळी शिवसेनेचे उमेदवार शेखर गोरे, शिवसेना माण खटाव संपर्क प्रमुख शंकरभाई विरकर, रंगकामगार संघटनेचे कार्याध्यक्ष धनाजी सावंत आदींची उपस्थिती होती.
हेही वाचा- शरद पवारांच्या 'त्या' व्हायरल व्हिडिओवर अजित पवारांनी दिले मजेशीर उत्तर
नितीन बानुगडे पाटील म्हणाले, माणखटाव दुष्काळी भाग माझ्या जन्मापासून ऐकत आलो आहे. दुष्काळी भागातील शेकडो कुटुंबांना पोटाची खळगी भरण्यासाठी मुंबई व उपनगरात जगण्यासाठी यावे लागत आहे. मागील पन्नास वर्षात नक्की काय झाले जनावरे छावणीला जनता दावणीला. पन्नास वर्षात तोच खर्च माणखटावच्या पाणी प्रश्नावर खर्च केला असता, तर दुष्काळ कधीच हटला असता, अशी टीकाही त्यांनी केली.
कडकनाथ आधी तुझ बघ मग दुसऱ्याची माप काढ - शिवसेनेचे उमेदवार शेखर गोरे
यावेळी शेखर गोरे म्हणाले, ते सदाभाऊ खोत आता कडकनाथ म्हणून ओळखले जावू लागले आहेत. ते लोकसभेला उभे राहिले. त्यांना दुष्काळी माण खटावच्या जनतेने मते दिली. पण हा बहाद्दर परत इकडे फिरकलाच नाही. अन आता म्हणताय आपल्या जयाभाऊला निवडून द्या. येथे आम्हाला हक्काच कायमच पाणी पाहिजे. तरुणांना रोजगार पाहिजे. ही माझी जनता गाव सोडून पोटाची खळगी भरण्यासाठी मुंबईत आली आहे. हाच रोजगार जर आपल्या मातीत मिळाला असता तर इतक्या लांब यायची गरज होती का. या स्वार्थी राज्यकर्त्यांनी फक्त या भोळ्याभाबड्या जनतेचा मतांसाठी वापर करून घेतला आहे.
हेही वाचा - मनसेचा उमेदवार 'चंपा'ची चंपी करणार - राज ठाकरे
आरे कडकनाथ आधी तुझ बघ मग दुसऱ्याची माप काढ. जिकडे जाईल तिकडे यांना भीती आहे कोणी कोंबड्या फेकतय की काय. परवा तर म्हसवडला म्हणे मुख्यमंत्र्यापेक्षा खोत यांच्या बंदोबस्तासाठीच जास्त फौजफाटा होता. तुम्हाला राज्यात फिरायची सोय राहिली नाही. एखादे पहाटेच कोंबडे आरवल तरी हे लगेच जागे होतात. अन हे आमची माप काढत आहेत. माजी लोकप्रतिनीधी ते कडकनाथ व खासदार यांची ही टोळी आहे. एकमेकांचे उद्योग मिटवायचे, वाढवायचे हे त्यांच उद्योग. ही टोळी माण खटावला लुटायला आली आहे. पण घाबरू नका त्यांचा बंदोबस्त करायला मी खंबीर आहे. यासाठी परिवर्तन घडवण्यासाठी मला एक संधी द्या, असे आवाहन शेखर गोरे यांनी केले.