महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

साताऱ्यात कोरोनाबाधित मृतदेहावर अंत्यसंस्कार, एकाच कुटुंबातील नऊ जण पॉझिटिव्ह

माण तालुक्यातील पांढरवाडी येथील एक महिला उपचारासाठी सातारा येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आली होती. तिच्यावर मागील आठ-दहा दिवसांपासून उपचार सुरु होते. मात्र, त्या महिलेच्या प्रकृतीत सुधारणा होत नव्हती. त्यामुळे गुरुवार ६ ऑगस्ट रोजी त्या महिलेचा स्वॅब घेण्यात आला. दरम्यान, संबंधित महिलेचा मृत्यू झाला.

साताऱ्यात कोरोनाबाधित मृतदेहावर अंत्यसंस्कार
साताऱ्यात कोरोनाबाधित मृतदेहावर अंत्यसंस्कार

By

Published : Aug 9, 2020, 10:45 PM IST

सातारा - माण तालुक्यातील पांढरवाडी येथील कोरोनाबाधित महिलेच्या मृतदेहाशी संपर्क आल्यामुळे एकाच घरातील 9 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. सातारा येथील एका खासगी रुग्णालयात ही महिला दाखल होती. तिचा स्वॅब घेतला होता. मात्र, त्याचा अहवाल येण्याआधीच मृतदेह नातेवाईकांकडे सोपवण्यात आला. यातून रुग्णालयाचा निष्काळजीपणा समोर आला आहे. अंत्यसंस्काराला शंभर-एक लोक उपस्थित होते, तर परगावाहून आलेले अनेक नातेवाईक परत गावीही गेले आहेत.

माण तालुक्यातील पांढरवाडी येथील एक महिला उपचारासाठी सातारा येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आली होती. तिच्यावर मागील आठ-दहा दिवसांपासून उपचार सुरु होते. मात्र, त्या महिलेच्या प्रकृतीत सुधारणा होत नव्हती. त्यामुळे गुरुवार ६ ऑगस्ट रोजी त्या महिलेचा स्वॅब घेण्यात आला. दरम्यान, संबंधित महिलेचा मृत्यू झाला. चोवीस तास रुग्णालयात ठेवल्यानंतर अहवाल येण्यापूर्वीच संबंधित महिलेचा मृतदेह रुग्णालयाने कोरोनाबाबतची कोणतीही काळजी न घेता नातेवाईकांच्या ताब्यात दिला.

एका शववाहिकेतून सदर मृतदेह पांढरवाडी येथे आणण्यात आला. त्या मृतदेहावर शुक्रवारी 7 ऑगस्ट रोजी सकाळी पारंपारिक पध्दतीने सर्व धार्मिक विधी करून साधारण शंभरच्या आसपास नातेवाईक व ग्रामस्थांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यानंतर शनिवारी सायंकाळी जिल्हा माहिती कार्यालयाने प्रसिद्ध केलेल्या माहितीत संबंधित महिला कोरोनाबाधित असल्याचे जाहीर करण्यात आले. अहवाल येण्याअगोदरच संबंधित महिलेला कोरोनाची लागण नसल्याचे समजून गावकर्‍यांनी अंत्यविधी केला होता. या अंत्यविधीमुळे मृतदेहाचा अनेकांशी संपर्क आला होता.

संपर्कात आलेल्या नऊ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. संबंधित मृत महिलेच्या कुटुंबातीलच हे सगळेजण असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे. यात दोन पुरुष, दोन महिला, तीन मुली, एक मुलगा व एक 20 वर्षीय तरुण यांचा समावेश आहे. धक्कादायक म्हणजे हे मृतदेह हाताळलेले अनेक नातलग अंत्यसंस्कार झाल्यानंतर अन्य गावात गेले आहेत. अशा सगळ्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. पांढरवाडी गावातील ज्या जाधववाडी वस्तीवर हा प्रकार झाला. तेथील 143 जणांची प्राथमिक तपासणी केली. त्यापैकी 28 जणांची अ‍ॅण्टीजन्ट टेस्ट केली. त्यापैकी 9 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे निदान झाले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details