सातारा - खासदार उदयनराजे भोसले यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा चांगल्याच रंगल्या आहेत. राज्यातील अनेक नेतेदेखील याकडे उत्सुकतेने पाहत आहेत. या पार्श्वभूमीवर आज खासदार अमोल कोल्हे यांनी उदयनराजे भोसले यांची शासकिय विश्रामगृहात भेट घेतली. दोन्ही नेत्यांनी यावेळी बंद दाराआड चर्चा केली. यावेळी, तुमच्याकडून उदयनराजेंचे मन वळविण्याचे प्रयत्न सुरू आहेत का, या प्रश्नावर कोल्हे म्हणाले, "मावळा छत्रपतींचे मन वळवू शकत नाही. छत्रपती निर्णय घेतात त्याप्रमाणे मावळा वाटचाल करतो."
'मावळा छत्रपतींचे मन वळवू शकत नाही', उदयनराजेंच्या भेटीनंतर अमोल कोल्हेंची प्रतिक्रिया - खासदार उदयनराजे भोसले भाजप प्रवेश
आज खासदार अमोल कोल्हे यांनी उदयनराजे भोसले यांची शासकिय विश्रामगृहात भेट घेतली. दोन्ही नेत्यांनी यावेळी बंद दाराआड चर्चा केली.
पत्रकारांसोबत बोलताना अमोल कोल्हे म्हणाले, मी साताऱ्यात आल्यावर नेहमी उदयनराजेंची भेट घेतो. त्याप्रमाणेच आजची ही भेट होती. ते माझे मार्गदर्शक आहेत आणि मी त्यांचा चाहता आहे. मी छत्रपती संभाजी आणि राजमाता जिजाऊ या मालिकेविषयी त्यांच्याशी चर्चा केली. महाराजांनी भाजपमध्ये जावे की नाही, हा प्रश्न विचारला असाता, उदयनराजे मिश्किलपणे म्हणाले, महाराजांनी पृथ्वीवर राहावे असेच कोल्हे यांना वाटते. अमोल कोल्हे पुढे म्हणाले, "महाराजांवर संपूर्ण महाराष्ट्राचे प्रेम आहे. प्रत्येकाला वाटते महाराज आपल्यासोबत राहावे. पण जी व्यक्तीमत्वे स्वयंभू असतात ती स्वत:चा निर्णय स्वत: घेऊ शकतात. त्यामुळे महाराजांच्या पुढील वाटचालीस माझ्या शुभेच्छा आहेत."