महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

शिवेंद्रराजेंनी सोडली 'जाणता राजा'ची साथ...आमदारकीचा राजीनामा, उद्या करणार भाजप प्रवेश - udyanraje bhosle

शिवेंद्रराजे भोसले यांनी आज आमदारकीचा राजीनामा दिला आहे. उद्या मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ते भाजपमध्ये प्रवेश करतील. राजकीय वातावरण पाहून मी हा निर्णय घेतला असल्याचे शिवेंद्रराजेंनी म्हटले आहे.

शिवेंद्रराजे भोसले

By

Published : Jul 30, 2019, 11:26 AM IST

Updated : Jul 30, 2019, 1:31 PM IST

सातारा- सातारा व जावळी तालुक्यातील सर्व कार्यकर्त्यांशी चर्चा केल्यानंतर राष्ट्रवादीचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे. बुधवारी (ता. 31) शिवेंद्रराजे भोसले आपल्या लाखो समर्थकांसमवेत मुंबई येथे सकाळी 11 वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. तसेच मंगळवारी त्यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला. भाजपने सातारा जिल्ह्याची संपूर्ण जबाबदारी शिवेंद्रराजेंना देण्याचा निर्णय घेतला आहे.

शिवेंद्रराजे भोसले

शिवेंद्रराजे यांनी सातार्‍यात ‘सुरुचि’ येथे आजी, माजी नगरसेवकांच्या उपस्थितीत बैठक घेतली. या बैठकीत सर्व कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीचे राजीनामे देण्याचा निर्णय शिवेंद्रराजेंसमोर जाहीर केला होता. मंगळवारी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांना भेटून शिवेंद्रराजेंनी आपला राजीनामा सोपवला. राजकीय वातावरण पाहून मी भाजप प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. येत्या निवडणुकांमध्ये भाजपचाच विजय होणार आहे, असं शिवेंद्रराजेंनी पत्रकारांशी बोलताना म्हटलं आहे.

स्थानिक पातळीवर खासदार छत्रपती उदयनराजे भोसले व आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्यात अनेक वेळा वाद झाले होते. शरद पवारांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत त्यांनी आपल्यावरील अन्यायाचा पाढा वाचला. उदयनराजेंचे मी बघतो; पण तुम्ही पक्ष सोडू नका, असे पवारांनी त्यांना सांगितले होते. मात्र, आपण कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेऊ, असे शिवेंद्रराजेंनी पवारांना सांगितले. दुसरीकडे शिवेंद्रराजेंचा निर्णय निश्‍चित झाला होता. त्यांनी पवारांच्या बैठकीनंतर लगेचच कोल्हापुरात जाऊन भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची भेट घेतली. संभाव्य राजकीय शक्यतांची चर्चाही केली. शेवटी मंगळवारी त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिला.

याबाबतची संपूर्ण माहिती देण्यासाठी सोमवारी सुरुचि या आपल्या निवासस्थानी शिवेंद्रराजेंनी सातारा शहरातील आजी-माजी नगरसेवक, पार्लमेंटरी बोर्ड व कार्यकर्त्यांची महत्त्वपूर्ण बैठक बोलावली. या बैठकीत उपस्थित सर्वांनी राष्ट्रवादीचे राजीनामे देण्याचा निर्णय जाहीर केला. त्याच वेळी बाबाराजे आपण तातडीने भाजपमध्ये प्रवेश करावा, असा कौल कार्यकर्त्यांनी दिला. मुख्यमंत्री व भाजपने आपला सन्मान ठेवण्याचा निर्णय दिला असल्याची माहितीही शिवेंद्रराजे यांनी दिली. त्यानंतर शिवेंद्रराजेंनी सातारा व जावळी तालुक्यातील सर्व कार्यकर्त्यांशी फोनवरून व काही ठिकाणी प्रत्यक्ष भेटून चर्चा केली. त्यानंतर त्यांनी आपल्या भाजप प्रवेशाचा निर्णय कार्यकर्त्यांना सांगितला. त्यानुसार उद्या दि. 31 रोजी शिवेंद्रराजे आपल्या समर्थकांसमवेत भाजपमध्ये जाणार आहेत.

Last Updated : Jul 30, 2019, 1:31 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details