सातारा : राज्यात भाजप विरोधात महाविकास आघाडीची मोट घट्ट होत असताना सातारा जिल्ह्यात मात्र महाविकास आघाडीत बिघाडी होताना पाहायला मिळत आहे. काँग्रेसच्या ताब्यात असलेल्या कराड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सत्तेसाठी राष्ट्रवादीने भाजपसोबत घरोबा केला आहे. परंतु, हा घरोबा भाजपमधील इतरांच्या पचनी पडलेला नाही. त्यामुळेच भाजपचा दुसरा गट या घरोब्याविरोधात आहे.
काय आहे बाजार समितीचा इतिहास? :कराड शेती उत्पन्न बाजार समितीवर 40 वर्षाहून अधिक काळ काँग्रेसचे दिवंगत नेते, माजी मंत्री विलासकाका उंडाळकर यांची एकहाती सत्ता होती. या सत्तेला सुरूंग लावण्यासाठी 2008 मध्ये कराड तालुक्यातील काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजपमधील सर्व उंडाळकर विरोधकांनी महाविकास आघाडी स्थापन करून बाजार समितीत सत्तांतर घडविले होते. परंतु, त्यानंतर झालेल्या कृष्णा कारखान्याच्या निवडणुकीत उंडाळकर गटाच्या मदतीने भोसले गटाने कारखान्याची सत्ता हस्तगत केली. त्या मदतीच्या बदल्यात बाजार समितीच्या निवडणुकीत भोसले गटाने उंडाळकर गटाला मदत केली आणि उंडाळकर गटाने पुन्हा बाजार समितीची सत्ता काबीज केली.
महाराष्ट्र केसरी पै. संजय पाटलांची हत्या :कराड बाजार समितीत २००८ सालाच्या अखेरीस महाविकास आघाडीच्या माध्यमातून झालेल्या सत्तांतरानंतर 15 जानेवारी 2009 ला महाराष्ट्र केसरी पै. संजय पाटील यांची हत्या झाली होती. त्या निवडणुकीत पै. संजय पाटील यांनी मनगटशाही आणि पैशाचा वारेमाप वापर केल्याची चर्चा अनेक दिवस होती. पै. संजय पाटील यांच्या हत्येचा खटला देखील राज्यभर गाजला होता. विलासकाका उंडाळकर यांचे पूत्र अॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांना या खटल्यात मुख्य आरोपी करण्यात आले होते. त्यातून त्यांची निर्दोष मुक्तता झाली होती.