सातारा - केंद्र सरकारने घेतलेल्या कांदा निर्यात बंदीच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसने शनिवारी (दि. 19 सप्टें.) सातार्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर थाळीनाद आंदोलन केले. यावेळी मोदी सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी आमदार शशिकांत शिंदे यांनी बिहारची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून घेतलेला निर्णय बंद करावा, अशी मागणी केली.
आमदार शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे की, गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी कांद्याच्या दरात सातत्याने होत असलेल्या घसरणीमुळे कांदा उत्पादक शेतकरी मेटाकुटीला आला आहे. त्यातच केंद्र शासनाने कांदा निर्यात बंदी लावल्याने शेतकरी हैराण झाला आहे. ही निर्यात बंदी बिहारमधील निवडणुका डोळ्यासमोर ठेवून करण्यात आली आहे. हे सर्वसामान्य शेतकर्यांचे सरकार नाही, असे यातून स्पष्ट होते. या एका निर्णयामुळे देशातील कांदा उत्पादक शेतकरी केंद्रातील मोदी सरकारने देशोधडीला लावला.
दुष्काळ, गारपीट, टंचाई, रोगराई अशा कित्येक नैसर्गिक आव्हानांचा सामना करत असताना शेतकर्याने पोटच्या मुलाप्रमाणे सांभाळलेले पीक शेतकर्यांना मातीमोल भावाने विकावे लागणार आहे. एकरी सुमारे 70 हजार रुपये खर्च करुन शेतात तयार झालेला कांदा चांगला दर मिळेल या आशेने ऐरणीत 6 महिन्यांपासून सडू लागला आहे. खटाव तालुक्याचा उत्तर भाग तसेच कोरेगाव, माण तालुक्यातील शेकडो ट्रक कांदा सध्या ऐरणीत पडून आहे. बदलत्या वातावरणामुळे कांद्याला कोंब येणे, पावसाचे पाणी शिरल्यामुळे कांदा नासणे तसेच काजळी चढून रंग बदलत असल्याने ऐरणीतच कांदा बाद होत आहे.