कराड (सातारा) -भारतातील सर्पांविषयी समाजात अंधश्रद्धा आणि गैरसमज आहेत. त्यामुळेच सर्पांचा छळ होऊन त्यांचा हकनाक बळी जातो. साप डूख धरतो. नागाच्या डोक्यावर मणी असतो. नाग पुंगीच्या तालावर डोलतो, दूध पितो, यासारख्या अनेक गैरसमजाविषयी रयत शिक्षण संस्थेच्या रयत विज्ञान मंडळाचे समन्वयक डॉ. सुधीर कुंभार हे अनेक वर्षांपासून प्रबोधन करत आहेत. साप हा शेतकर्यांचा मित्र असतो. तसेच सगळेच साप हे विषारी नाहीत. त्यामुळे सापांना जगू द्या, असे आवाहन नागपंचमी सणाच्या निमित्ताने डॉ. कुंभार यांनी केले आहे.
'अनेक गैरसमज जास्त'
रयत शिक्षण संस्थेच्या कडेगाव (जि. सांगली) येथील महात्मा गांधी विद्यालयातील विज्ञान शिक्षक तसेच विज्ञान समन्वयक असलेल्या डॉ. सुधीर कुंभार यांनी सर्पांची शास्त्रीय माहिती तसेच अंधश्रद्धा आणि गैरसमज, यावर कार्टून स्लाईड शो द्वारे प्रकाशझोत टाकला आहे. सर्पाच्या डोक्यावर नागमणी असतो, पुंगीच्या तालावर नाग डोलतो, असे चित्रपटात दाखविले जाते आणि लोक त्यावर विश्वास ठेवतात. परंतु, हे निव्वळ गैरसमज आहेत. साप डूख धरतो, असे लोक मानतात. परंतु, सापाचा मेंदू हा माणसाइतका प्रगल्भ नसतो. सापाचा मेंदू फार छोटा असतो. त्याचप्रमाणे सापाला ऐकू येते, हा देखील गैरसमज मोठ्या प्रमाणात आहे. वास्तविक सापाला कान नसतात. गारूड्याच्या हातातील पुंगीच्या हालचालीनुसार नाग हालचाल करतो. त्यामुळे नाग पुंगीच्या तालावर डोलतो, हे लोकांनी लक्षात घेतले पाहिजे. साप हा सस्तन प्राणी नाही. त्यामुळे सापाच्या अंगावर केस असतात, हा गैरसमजही लोकांनी डोक्यातून काढून टाकावा, असे डॉ. सुधीर कुंभार सांगतात.
'साप दूध पितो ही अंधश्रद्धा'