सातारा -साताऱ्यात छत्रपती शाहू क्रीडा संकूलात 64 वी महाराष्ट्र केसरी ( Maharahstra Kesari ) स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत कोल्हापूरच्या पृथ्वीराज पाटीलने मुंबईच्या विशाल बनकरचा 5-4 असा पराभव ( Maharashtra Kesari Winner Prithviraj Patil ) केला. त्यानंतर पृथ्वीराज पाटीलने आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत मिळालेले यश मी माझ्या कोल्हापूर जिल्ह्याला अर्पण करतो. आता ऑलिंपिक वर्ल्ड चॅम्पियनशिप हे माझे ध्येय आहे, असा दृढनिश्चय पृथ्वीराज पाटीलने 'ईटिव्ही भारत'शी बोलताना व्यक्त केला.
जिंकायचचं ठरवून उतरलो - पुढे बोलताना पृथ्वीराज पाटील म्हणाला की, "महाराष्ट्र केसरीची गदा काहीही करुन जिंकायचीच असा निश्चिय करुन मी उतरलो होतो. पूर्वीपासून मला ही कुस्ती जिंकणार, असा विश्वास होता. सुरुवातीला प्रतिस्पर्ध्याचा अंदाज घेऊन शेवटी आक्रमण करायचे धोरण ठरवले होते. साताऱ्यात मी जे ठरवले होते त्याप्रमाणे कुस्ती होत गेली. अंतिम क्षणी माझी चाल यशस्वी झाली. मी माझे हे यश कोल्हापूर जिल्ह्याला अर्पण करतो," असेही पृथ्वीराज पाटील याने म्हटले आहे.