सातारा -गड किल्ल्यांबाबत आपण केलेल्या विधानाचा विपर्यास करण्यात आल्याचे स्पष्टीकरण छत्रपती उदयनराजे भोसले यांनी दिले आहे. निवडणुका आल्या की चारित्र्यहनन करणे किळसवाणे असून गड-किल्ल्यांवर डान्सबार उघडा, असे म्हणण्याचा विचार मनात येण्यापेक्षा मेलेले बरे, अशी भावनाही त्यांनी वाई येथे पत्रकार परिषदेत व्यक्त केली.
गड-किल्ले ही छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाचे प्रतिक आहेत. त्यांचे संवर्धन व्हावे, असे माझे म्हणणे आहे. याबाबत राज्य शासनानेही नियोजन केले आहे. गड-किल्ल्यांबाबत मी जे वक्तव्य केलेच नाही त्याचे खापर माझ्यावर फोडण्याचा प्रयत्न होत आहे, असा आरोपही त्यांनी केला आहे. उदयनराजे पुढे म्हणाले, गड-किल्ले पुरातत्व विभागाच्या ताब्यात असून लोकांना किल्ल्यावर जाता यावे, राहण्याची व्यवस्था असावी, यासाठी याठिकाणी काही आवश्यक उपाययोजना करणे गरजेचे आहे. त्यामुळे राज्य शासनाने जी भूमिका मांडली, त्या भूमिकेनुसार गड-किल्ल्यांच्या पायथ्याशी राहण्याची व्यवस्था असावी, गडावर जाण्यासाठी रोपवे असावे, असे माझे म्हणणे होते. मात्र, माझ्या बोलण्याचा विपर्यास करण्यात आला आहे.