सातारा -भुईंजजवळील महिलेच्या खूनप्रकरणी फरारी संशयित नितीन आनंदराव गोळे (वय ३८, व्याहळी, ता. वाई) याला अखेर बेळगाव येथे भुईंज पोलिसांनी अटक केली. त्याने चौकशीदरम्यान स्वत:च्या पत्नीचाही अडीच वर्षांपुर्वी खून करून तिचा मृतदेह डोंगर परिसरात पुरल्याची धक्कादायक माहिती पोलिसांना दिली.
याबाबत माहिती देताना पोलीस अधीक्षक अजितकुमार बन्सल अडीच वर्षांपासून पत्नी होती बेपत्ता -
प्रेयसी संध्या विजय शिंदे (वय ३४ रा. कारी, ता.सातारा) व संशयिताची पत्नी मनीषा नितीन गोळे (वय ३४, रा. व्याजवाडी, वाई) अशी खुन झालेल्या महिलांची नावे आहेत. यातील मनिषा गोळे ही अडीच वर्षांपासून बेपत्ता आहे. संध्याच्या खुनप्रकरणात अटक केल्यानंतर त्याने पत्नीचाही खुन केल्याची कबुली पोलिसांजवळ दिली.
आधारकार्डच ठरले पोलिसांचा आधार -
पोलिसांनी सांगितले की, ३१ जुलैच्या रात्री दहा वाजता सातारा येथून संध्या विजय शिंदे या बेपत्ता झाल्या होत्या. त्याची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात झाली होती. मंगळवारी ३ ऑगस्टला सायंकाळी पाच वाजता आसले (ता. वाई) येथील ऊसाच्या शेतात एक मृतदेह आढळून आला. तेथे सापडलेले आधारकार्ड व इतर कागदपत्रांवरुन हा मृतदेह संध्या शिंदे हिचा असल्याची खात्री झाली. मृतदेहाचे बांधलेले हात आणि तोंडावरील जखमांवरून हा खुनच असावा, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज होता. भुईंजचे सहाय्यक पोलिस निरीक्षक आशिष कांबळे यांनी तपासाला सुरुवात केली.
हेही वाचा -साक्षी आणि प्रतीक्षा दाभेकरचे शैक्षणिक पालकत्व नगरविकास मंत्र्यांनी स्वीकारले
संबंधाच्या संशयावरुन दोन्ही खून -
बुधवारी सकाळी (कारी, ता. सातारा) येथे अंत्यसंस्कार झाल्यानंतर नातेवाईकांनी भुईंज पोलीस ठाण्यात जाऊन संध्या शिंदे हिचा खून नितीन गोळे यानेच केला असल्याची फिर्याद दिली. पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तातडीने तपास करुन संशयिताला कर्नाटक येथे अटक केली. भुईंज पोलीस ठाण्यात आणून त्याच्यावर दोन महिलांचा गळा आवळून खून केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्याच्याकडे कसून चौकशी केली असता मृत संध्या शिंदे व त्याची स्वतःची पत्नी मनीषा नितीन गोळे हिचा १ मे २०१९ यादिवशी खून केल्याची कबुली दिली. दोन्ही महिलांचे खून त्याने अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरुन केल्याचे पोलिसांनी सांगितले.
५ दिवसांची पोलीस कोठडी -
पत्नीचा मृतदेह त्याने निर्मनुष्यस्थळी पुरून टाकल्याचे सांगितले. पोलिसांनी घटनास्थळावरुन महिलेच्या बांगड्या व इतर काही वस्तू हस्तगत केल्या. संशयितास वाईच्या न्यायालयात हजर केले असता त्याला ५ दिवसांची पोलीस कोठडी न्यायालयाने सुनावली.
वाई तालुक्यातील दुसरा प्रकार -
धोम येथील डॉ. संतोष पोळने ६ महिलांचा खून करून त्यांनाही स्वतःच्या अंगण व फार्म हाऊसमध्ये जमिनीत गाडले होते. या साखळी खून प्रकरणाला सातारा व वाई पोलिसांनी वाचा फोडून ६ महिलांचे मृतदेह फार्महाऊस व अंगणातून काढून प्रकरणाचा छडा लावला होता. त्याचीच पुनरावृत्ती वाई तालुक्यातील या प्रकरणामुळे झाली. नितीन गोळे याने दोन महिलांंच्या खुनाची कबुली दिल्याने पुन्हा एकदा वाई तालुक्यात खळबळ उडाली आहे.