सातारा :ईशान्येतील नागालँड राज्यात नुकत्याच झालेल्या निवडणुकीनंतर तिथे सर्वपक्षीय सरकार सत्तेत आले आहे. देशभरात भाजपविरोधी भूमिका घेणारा राष्ट्रवादी काँग्रेसपक्षही तिथल्या सरकारमध्ये सहभागी झाला आहे. त्यावरून राष्ट्रवादीने भाजपला पाठिंबा दिल्याची चर्चा सुरू झाली आहे. नागालँडमध्ये भाजप आणि राष्ट्रवादीने एकत्र येऊन स्थापन केलेल्या सरकारबाबत साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी मोठे आणि सूचक वक्तव्य केलं आहे. 'नागालॅंडमध्ये जे ठरले ते उद्या प्रत्येक ठिकाणी ठरेल' म्हणून वेट अँड वॉच, असे सांगत उदयनराजेंनी राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडवली आहे.
तिथे ठरले तसे इथेही ठरेल :रोखठोक वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत असणाऱ्या उदयनराजे भोसले यांना नागालॅंडमध्ये भाजप-राष्ट्रवादीने सत्ता स्थापन केली असल्याचा प्रश्न विचारला असता उदयनराजे म्हणाले, मी त्या बैठकीला नव्हतो. त्यामुळे मी भाष्य करणे योग्य नाही. तिथे जे ठरले तसे उद्या इथेही ठरेल आणि प्रत्येक ठिकाणी ठरेल. त्यामुळे मला माहिती नाही. पण, वेट अँड वॉच, असे सूचक वक्तव्यही त्यांनी केले.
पेटिंगच्या वादात शिवेंद्रराजेंची उडी : साताऱ्यात खासदार उदयनराजे भोसले यांच्या पेटींगवरून निर्माण झालेल्या या वादात त्यांचे चुलत बंधू आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनीही उडी घेतली आहे. खासदार उदयनराजेंच्या पेंटिंगचा वाद हा जम्मू-काश्मीर आणि महाराष्ट्र-कर्नाटक सीमा वादापेक्षाही गहण असल्याची उपरोधिक टीका शिवेंद्रराजेंनी केली आहे. खासदारांचे पेंटिंग कुठे काढायचे, याबाबत राज्यसभा निर्णय देईल, असा टोला देखील त्यांनी लगावला आहे.