उदयनराजे-शिवेंद्रराजे आमनेसामने सातारा : साताऱ्यातील बाजार समितीच्या जागेतील भूमिपूजनात खासदार उदयनराजे आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले हे आपल्या समर्थकांसह आमने-सामने आल्याने मोठा राडा झाला आहे. घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त दाखल झाला आहे. सुरुवातीला उदयनराजेंनी भूमिपूजनाचा कार्यक्रम थांबवून संपूर्ण साहित्य जेसीबीने उचलून टाकायला लावले. मात्र त्यानंतर आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी जागेच्या कायदेशीर स्थगिती बाबतची कागदपत्र दाखवावी, असा मुद्दा मांडून उदयनराजेंच्या समोरच जागेचे भूमिपूजन केले. त्यानंतर दोन्ही राजेंचे समर्थक आमने-सामने आले आणि त्यांच्यात धक्काबुक्की झाली आहे. सध्या घटनास्थळी दोन्ही बाजूचे समर्थक एकमेकांना भिडले आहेत. त्यामुळे मोठा बंदोबस्त मागविण्यात आला आहे.
जागेचा वाद पुन्हा उफाळला :पुणे-बंगळुरू महामार्गाजवळ खिंडवाडी येथे सातारा कृषी उत्पन्न बाजार समितीची जागा आहे. त्या जागेतील नूतन इमारतीचे आज भूमिपूजन होणार होते. तत्पूर्वी काही कार्यकर्त्यांनी घटनास्थळी पाेहचून जेसीबीने साहित्य उलथवून टाकले. तसेच एक कंटेनर देखील उलटा करुन टाकला. तेवढ्यात खासदार उदयनराजे भाेसले देखील घटनास्थळी पाेहचले आणि वातावरण तणावपूर्ण बनले.
बाजार समितीवर शिवेंद्रराजेंचे वर्चस्व :सातारा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नुकत्याच झालेल्या संचालक मंडळाच्या निवडणूकीत आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या नेतृत्वाखालील पॅनलने खासदार उदयनराजे भोसले यांच्या नेतृत्वाखालील पॅनलचा पुर्णपणे धुव्वा उडवला होता. निकालानंतर काहीच दिवसात खिंडवाडीतील जागेवरून दोन्ही राजे आमनेसामने आले. यावेळी दोन्ही राजेंच्या समर्थकांमध्ये धक्काबुक्की झाली. तणावाच्या पार्श्वभूमीवर मोठा बंदोबस्त घटनास्थळी दाखल झाला आहे.
भाजपच्या खासदार-आमदारात जुंपली :उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस बुधवार आणि गुरूवारी सातारा दौऱ्यावर आहेत. आज रात्री फडणवीस कराड मुक्कामी आहेत. गृहमंत्री जिल्हा दौऱ्यावर येत असताना भाजपच्या खासदार आणि आमदारामध्ये जुंपल्याने फडणवीसांची डोकेदुखी वाढणार आहे. सातारच्या राजघराण्यातील दोन बंधुंमधील राजकीय वादावर आता सामाजिक क्षेत्रातून प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.
हेही वाचा :
- Udayanraje Bhosale : तीन गोल किपर्सना चकवा देत उदयनराजेंनी केला गोल; पाहा व्हिडिओ
- Shivrajyabhishek Din 2023: शिवसृष्टीसाठी ५० कोटींचा निधी तर प्रतापगड प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी उदयनराजे, मुख्यमंत्र्यांची घोषणा
- Shivendra Raje on Udayanraje : टोलनाके चालविणारे छत्रपती घराण्यात जन्माला आलेच कसे? उदयनराजेंच्या टीकेला शिवेंद्रराजेंचे प्रत्युत्तर