सातारा -लोकसभा मतदारसंघात आपल्याला खात्रीने साडेतीन ते पावणे चार लाखाचे मताधिक्य आहे, असा दावा खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी केला आहे. मी राजीनामा देतो पुन्हा फेरमतदान होऊ दे, तितक्याच मताधिक्कयाने निवडून येईल, असे म्हणत त्यांनी बॅलेट पेपरद्वारे फेरनिवडणूक घेण्याची तयारी आहे का? असा सवाल निवडणूक आयोगाला केला आहे.
ईव्हीएम मशीनमुळे लोकशाही धोक्यात आल्याचा आरोप उदयनराजे यांनी करत ही यंत्रणा म्हणजे देशाच्या व्यवस्थेला लागलेली कीड आहे, ती उखडून टाकायला हवी, असे वक्तव्य केले. दरम्यान, ईव्हीएम मशीनवरून होणार्या निवडणुकांना त्यांनी जोरदार आक्षेप घेतला. ते आज सातारा येथील पत्रकार परिषदेत बोलत होते.
देशभरातील मतदारसंघामध्ये ईव्हीएम मशीनमधील आकडेवारीत घोळ झाला आहे. सातारा लोकसभा मतदारसंघात ६ विधानसभा मतदारसंघनिहाय झालेले मतदान आणि मतमोजणी यांच्यामध्ये फरक दिसून येत आहे. ईव्हीएम मशीनमध्ये गडबडी झाल्याचा आरोप करत मी आत्ता राजीनामा देतो. या मतदारसंघात बॅलेट पेपरवर फेरमतदान घ्या, असे खुले आव्हान उदयनराजे यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाला दिले.
सर्वोच्च न्यायालयाने अधिकाराने या विषयावर भाष्य करायला हवे, मात्र, या विषयावर दाद मागणार्यालाच कारवाईची भाषा वापरली जाते, हे चुकीचे असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले. उदयनराजे कधी रडीचा डाव खेळत नाही, लोकशाहीचा गळा घोटणार्या या यंत्रणेपेक्षा राजेशाही काय वाईट होती? या प्रकाराला वेळीच पायबंद घातला नाही तर १८५७ च्या बंडाप्रमाणे सर्वत्र रक्तपात होऊन सारी व्यवस्था नष्ट होईल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.
मी एका निवडणुकीत पडलो तरीसुध्दा रडलो नाही. आता तर मी विजयी झालो आहे. मी रडीचा डाव खेळत नाही. देशभरात ३७६ मतदारसंघात घोळ झाल्याचा संशय आहे. आयोगाने पोर्टलवरून आकडेवारी हटवल्याने संशय आणखीनच वाढला आहे. आम्ही म्हणेल तोच कायदा, म्हणे व्हायरस शिरला मशिनमध्ये. न्यायालयात जावे तरी न्यायालय तक्रारदारालाच बंधने घालत आहे. आता माझ्या सातारा मतदारसंघात आकडेवारीत घोळ आहे, आता काय करणार न्यायदेवता? सरळ चिट्ठ्या टाकून लोकप्रतिनिधींच्या निवडी करा, कशाला निवडणुकीवर खर्च करता, असे म्हणत उदयनराजेंनी ईव्हीएम मशीनवर निशाना साधला.