कराड (सातारा) -चोरलेल्या मोटरसायकली विकून त्या पैशात मौजमजा करणाऱ्या चौघांना सोमवारी जेरंबद करण्यात आले आहे. ही कारवाई कराड शहर पोलिसांनी केली. हे चौघे तालुक्यातील उंब्रज येथील रहिवासी आहेत. ज्ञानेश उध्दव चव्हाण (रा. भवानवाडी-उंब्रज), मनोज मनोहर विभुते (रा. उंब्रज) अनिकेत बबन वाघमारे (रा. कोर्टी-उंब्रज) आणि राहुल शंकर घागरे (रा. यमाई गल्ली, उंब्रज) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तसेच त्यांनी चोरलेल्या 7 मोटरसायकलीही त्यांच्याकडून पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत. त्यापैकी 6 मोटरसायकली कराड शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून आणि 1 मोटरसायकल सातारा तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरल्याची कबुली संशयितांनी दिली आहे.
मोटरसायकली चोरीस जाण्याचे प्रमाण वाढल्यानंतर पोलीस अधीक्षकांनी चोरट्यांची माहिती संकलित करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कराड शहर पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक राहूल वरोटे, अमित बाबर हवालदार सुनील माने, प्रवीण काटवटे, कुलदीप कोळी, प्रफुल्ल गाडे, मारूती लाटणे, प्रशांत पवार, बाजीराव पवार, धीरज कोरडे यांनी गोपनीयरित्या माहिती संकलित करण्यास सुरूवात केली. त्यामध्ये वरील आरोपींची नावे निष्पन्न झाली.