सातारा :जिल्ह्यातील कोरोनाबाधितांनी दोन हजाराचा टप्पा ओलांडला असून रात्री उशिरा जाहीर करण्यात आलेल्या अहवालानुसार 70 संशयितांचा अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे. सातारा शहर व तारळे (ता. पाटण) येथील दोन ज्येष्ठ नागरिकांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
बाधितांमध्ये निकट सहवासित 56, प्रवास करून आलेले 2, सारीबाधित 10 असे 68 आणि यानंतर रात्री उशिरा आणखी 2 असे एकूण 70 नागरिकांचा अहवाल कोरोनाबाधित आला आहे. कोरोना बाधितांमध्ये जावली तालुक्यातील पुनवडी या एकाच गावातील 16 जणांचा समावेश आहे. याशिवाय सातारा तालुक्यातील 11, कराड 15, खंडाळा 3, खटाव 4, महाबळेश्वर 12, पाटण 8 व माण तालुक्यातील एक असे ७० संशयित बाधित आढळले.
सातारा शहरामधील खासगी हॉस्पिटल येथे तारळे (ता. पाटण) येथील 75 वर्षीय पुरुषाचा 15 जुलै रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. कोरोना संशयित म्हणून उपचार सुरू असलेल्या या रुग्णाचा कोरोना अहवाल मात्र पॉझिटिव्ह आला. तसेच क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयात बुधवार नाका येथील 93 वर्षीय व्यक्तीचा गुरुवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. त्यांचा उपचारादरम्यान घेतलेला नमुना कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले.
श्वसन संस्थेचा तीव्र संसर्ग झाल्याची लक्षणे असल्याने या दोघांवरती उपचार सुरू होते, अशी माहिती डाॅ. गडीकर यांनी दिली. दरम्यान जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 2 हजार 141 झाली असून 890 बाधित उपचार घेत आहेत. कोरोनामुळे मृतांचा आकडा 72 झाला आहे.