सातारा : श्रीलंकेतील एका कामाचे कॉन्ट्रॅक्ट अदानीला देण्यासाठी मोदींनी श्रीलंकेच्या अध्यक्षांवर दबाव आणल्याचा सनसनाटी आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या तळबीड (ता. कराड) गावात काँग्रेसच्या 'हात से हात जोडो' अभियानात ते बोलत होते. नरेंद्र मोदींची जगभ्रमंती ही अदानीला कॉन्ट्रॅक्ट देण्यासाठीच होती का? असा सवालही त्यांनी केला.
मोदींमुळे अदानी तिसऱ्या क्रमांकावर :पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गौतम अदानी हे श्रीमंतांच्या यादीत ६९० व्या स्थानी होते. नरेंद्र मोदी सत्तेवर आल्यापासून अदानी तिसऱ्या क्रमांकावर आले. पंतप्रधान होण्याआधी मोदी अदानींच्या विमानातून फिरत होते. आता अदानी मोदींच्या सरकारी विमानातून फिरत आहेत.
संसदेत उत्तर देणे टाळले :मोदी आणि अदानी यांच्या मैत्रीबद्दलचे दाखले राहुल गांधी यांनी संसद अधिवेशनात मांडून देशाचे लक्ष वेधले. परंतु, मोदींनी त्यांच्या प्रश्नावर उत्तर देण्याऐवजी वेगळेच विषय संसदेत मांडून लक्ष विचलित केले. राहुल गांधींच्या भाषणावर बंदी घातली. आता राहुल गांधी यांना स्पष्टीकरण मागितले आहे. राहुल गांधींवर सूडबुद्धीने कारवाईचा प्रयत्न होत असल्याचा आरोप पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.
मोदींचा कारभार हुकूमशाही :मोदी सरकार लोकशाहीची मूल्ये पायदळी तुडवीत असल्याचे पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले, सरकारच्या चुकीच्या निर्णयावर बोलणाऱ्यांचा आवाज बंद केला जात आहे. त्यातून मीडियादेखील सुटलेला नाही. बीबीसी वृत्तवाहिनीच्या भारतातील कार्यालयावर आयकर विभागाच्या धाडी पडल्या आहेत. यावरून मोदींना मनमानी करायची असल्याचे स्पष्ट होते.
हिंडनबर्ग यांच्या अहवालावर अदानी अनुत्तरीत :हिंडेनबर्ग रिसर्चने अदानींच्या उत्तराचे खंडन करताना म्हटले की, काही तासांपूर्वी अदानींनी 413 पानांचे उत्तर दिले. त्यांनी तार्किक उत्तरे देण्याऐवजी त्यांच्या उत्तरांना राष्ट्रवादाचा मुलामा चढवला. आम्ही आमच्या अहवालात अदानी समूहाला 88 प्रश्न विचारले होते, अदानी त्यापैकी 62 प्रश्नांची उत्तरेच देऊ शकले नाहीत. हिंडेनबर्ग रिसर्चने अदानी समूहाला फटकारत म्हटले आहे की, अदानी समूहाने त्यांच्या उत्तरात आम्ही उपस्थित केलेल्या प्रत्येक मुख्य आरोपांकडे दुर्लक्ष केले आहे. अदानी समूहाने त्यांच्यावरील आरोपांना उत्तर देताना 413 पानांचा विस्तृत अहवाल प्रसिद्ध केला आहे. यात त्यांनी त्यांच्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. समुहाने हिंडेनबर्ग अहवालाला भारत आणि त्याच्या स्वतंत्र संस्थांवर हल्ला, असे म्हटले आहे. मात्र कळीच्या प्रश्नांना अदानींनी उत्तरच दिले नाही.
तार्किक उत्तरे दिली नाहीत : हिंडेनबर्ग रिसर्चने अदानींच्या उत्तराचे खंडन करताना म्हटले की, काही तासांपूर्वी अदानींनी 413 पानांचे उत्तर दिले. त्यांनी आमच्या आरोपांना तार्किक उत्तरे देण्याऐवजी उत्तरांना राष्ट्रवादाचा मुलामा चढवला. त्यांनी आमचा अहवाल हा भारतावर केलेला हल्ला असल्याचा दावा केला आहे. थोडक्यात अदानी समूहाने आपल्या यशाचा भारताच्या यशाशी सांगड घालण्याचा प्रयत्न केला, असे हिंडेनबर्ग रिसर्चने म्हटले आहे. हिंडेनबर्ग समूहाने म्हटले आहे की, अदानींच्या 413 पानांच्या उत्तरात आमच्या अहवालाशी संबंधित समस्यांवर फक्त 30 पाने आहेत. उर्वरित उत्तरात 330 पानांचे न्यायालयीन रेकॉर्ड, 53 पानांचे उच्च-स्तरीय आर्थिक, सामान्य माहिती आणि अप्रासंगिक कॉर्पोरेट उपक्रमांचे तपशील आहेत.
हेही वाचा : Shirdi Airport : साई भक्तांसाठी खुशखबर! शिर्डी विमानतळाला ‘नाईट लँडिंग’ परवाना मिळाला