सातारा-कोरोनाबाधित रुग्णाला घ्यायला गेलेल्या वाहनांवर जमावाने दगडफेक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यातील रांजणवाडी येथे हा प्रकार घडला आहे. यामध्ये जमावाने तीन वाहनांची तोडफोड करत आरोग्य कर्मचाऱ्यांना माघारी लावण्याचा प्रयत्न केला.
महाबळेश्वर तालुक्यातील रांजणवाडी येथील कोरोनाबाधित रुग्णाला कोरोना केअर सेंटरमध्ये घेऊन जाण्यासाठी नगरपालिका कर्मचारी आणि आरोग्यसेवक गेले होते. कोरोनाबाधित व्यक्तीच्या कुटुंबातील व्यक्तींनी रुग्णांवर घरातच उपचार करा, असा तगादा लावला. नागरिकांनीही कोरोना रुग्णाला घेऊन जाण्यासाठी आलेल्या कर्मचाऱ्यांना विरोध केला. यावेळी संतप्त जमावाने प्रशासनाच्या 3 वाहनांची तोडफोड केली.