सातारा - मराठा आरक्षणाचा निर्णय लांबणीवर पडला असताना राज्य सरकारने मेगा पोलीस भरतीचा निर्णय घेतला आहे. सरकारने अगोदर मराठा आरक्षणावरील स्थगिती उठवण्यासाठी तातडीने निर्णय घ्यावा, मगच पोलीस भरती करावी. अन्यथा सरकारला याचे परिणाम भोगावे लागतील, असा इशारा साताऱ्याचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिला.
'आधी मराठा आरक्षण नंतर पोलीस भरती; अन्यथा परिणामांना सामोरे जा' - शिवेंद्रसिंहराजे मेगा पोलीस भरती मत
पोलीस दलातील एकूण साडेबारा हजार पदे भरण्यात येणार असून राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्याबाबतचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयावर साताऱ्याचे आमदार शिवेंद्रसिंहराजे जोरदार टीका केली आहे. अगोदर मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावावा नंतरच पोलीस भरती करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
राज्य सरकारने स्थगिती उठवण्यासाठी लवकर हालचाल करावी अशी सकल मराठा समाजाची अपेक्षा आहे. मात्र, शासनाने मध्येच मेगा पोलीस भरती जाहिर केली आहे. मराठा समाजातील असंख्य कुटुबं आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहेत. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण मिळणे आवश्यक आहे. आरक्षणाचा निर्णय लांबणीवर पडलेला असताना मेगा पोलीस भरती घेणे हा मराठा समाजातील तरुण, तरुणींवर मोठा अन्याय आहे. यामुळे मराठा समाजात असंतोष निर्माण होईल, असे शिवेंद्रसिंहराजे यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
मराठा समाजावर अन्याय होवू नये यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी तातडीने निर्णय घ्यावा. मराठा आरक्षणाचा निर्णय होत नाही तोपर्यंत पोलीस भरती घेवू नये. अन्यथा याचे परिणाम सरकारला भोगावे लागतील, असा इशारा शिवेंद्रसिंहराजे यांनी पत्रकाद्वारे दिला आहे.