सातारा : नगरपालिका निवडणूक तोंडावर आल्यामुळे साताऱ्यात आमदार शिवेंद्रराजे आणि राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांच्यामध्ये विकासकामांवरून श्रेयवावाद उफाळला आहे. यावरून एकमेकांवर पत्रकबाजी आणि टीका-टीपण्णी सुरू आहे. श्रेयवादावरून आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी खासदार उदयनराजेंवर खोचक टीका केली आहे. साताऱ्यात ऑक्सिजन उदयनराजेंमुळेच येतोय, हा डायलॉग अजून ऐकायला मिळाला नाही, हेच सातारकरांचे नशीब, अशी टीका शिवेंद्रराजेंनी उदयनराजेंवर केली आहे. ते साताऱ्यात पत्रकार परिषदेत बोलत होते.
शिवेंद्र राजेंची उपहासात्मक टीका :शिवेंद्रराजे पत्रकार परिषदेत पुढे म्हणाले की, जिल्ह्यातील सर्वच नगरपालिकांना नगरोत्थानमधून निधी वाढवून मिळावा, अशी माझी भूमिका आहे. ही कामे माझीच आहेत. मी स्वतः बैठकीला होतो. माझ्या सह्या असून कामे मंजूर करून आणण्यासाठी प्रयत्न केले आहेत. त्यामुळे श्रेय घेण्याचा विषय येत नाही. सातारकरांना कामांचे श्रेय कोण घेत आहे, हे सातारकरांना माहित आहे. सातार्यात ऑक्सिजन पण उदयनराजेंमुळेच येतोय हे अजून ऐकायला मिळाले नाही, एवढेच आपले नशीब, अशी उपहासात्मक टीका आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी केली.