सातारा :सातारा नगरपालिकेची निवडणूक तोंडावर आल्याने राजे घराण्यात सध्या आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा उडाला आहे. संस्था स्थापन करून लोकांचे पैसे खाणारे लोक एवढ्या मोठ्या घराण्यात जन्माला आले कसे? अशी टीका खासदार उदयनराजे भोसलेंनी शिवेंद्रराजेंवर केली होती. त्याला प्रत्युत्तर देताना टोलनाके चालवणारे छत्रपती घराण्यात कसे काय जन्माला आले, असा जळजळीत सवाल करत शिवेंद्रराजेंनीही जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
उदयनराजेंनी किती संस्था काढल्या? : साताऱ्यातील गोडॊली तळ्याच्या सुशोभिकरणावेळी उदयनराजेंनी केलेल्या टीकेला शिवेंद्रराजेंनी सोमवारी पत्रकार परिषदेत प्रत्युत्तर दिले. या पत्रकार परिषदेत शिवेंद्रराजे म्हणाले की, उदयनराजेंनी काेणत्या संस्था काढल्या आणि किती लाेकांचे संसार चालविले हे त्यांनी सांगावे. छत्रपती घराण्यात जन्मलेल्यांनी टाेलनाका चालवावा. लाेकांकडून पैसे वसूल करावेत हे कितपत याेग्य आहे? पुर्वी छत्रपती शिवाजी महाराज हे वसूली करणाऱ्यांना चाप लावायचे. परंतु सध्या वेगळेच सुरु असल्याचा टाेलाही आमदार शिवेंद्रराजे भाेसले यांनी लगावला.
काय म्हणाले होते उदयनराजे? :सातारा विकास आघाडी ही लोकांची आघाडी आहे. आमचा आणि त्यांचा जाहीरनामा बघा. आम्ही आमच्या जाहीरनाम्याप्रमाणे कामे केली. त्यांच्या अजेंड्यात नसलेली कामे केली म्हणतात. मी त्यांच्या बाबतीत बोलून वेळ वाया घालवला आहे. मी ज्यांच्याबद्दल बोललो त्यांची पात्रता नाही. दुसऱ्याला कमी लेखून कोणी मोठा होत नसतो, असे उदयनराजेंनी म्हटले होते.