महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Shivendra Raje criticism Udayan Raje: मी नारळफोड्या गँगकडे लक्ष देत नाही; आ. शिवेंद्रराजेंची खा. उदयनराजेंवर टीका - MLA Shivendra Raje criticism of MP Udayan Raje

साताऱ्यातील दोन्ही राजेंमध्ये आरोप-प्रत्यारोपांचा कलगीतुरा सुरूच आहे. विकासकामे कोण करते, हे सातारकर जाणतात. त्यामुळे नारळफोड्या गँगच्या बडबडीला आपण महत्त्व देत नाही, अशी टीका आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी खासदार उदयनराजेंचे नाव न घेता केली आहे.

Shivendra Raje criticism Udayan Raje
आ. शिवेंद्रराजेंची खा. उदयनराजेंवर टीका

By

Published : Apr 11, 2023, 10:58 PM IST

सातारा: माझे काम सरळमार्गी असते. कोणी काहीही बोलले तरी माझे काम थांबणार नाही. विकासकामे कोण करते, हे सातारकर जाणतात. त्यामुळे नारळफोड्या गँगच्या बडबडीला आपण महत्त्व देत नाही, अशी टीका आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी खासदार उदयनराजेंचे नाव न घेता केली आहे.


साताऱ्यातील कामांसाठी भरीव निधी:सातारा शहरातील कुंभारवाडा ते समर्थ मंदिर आणि समर्थ मंदिर ते बोगदा या रस्त्याच्या डांबरीकरणाचा शुभारंभप्रसंगी बोलताना आ. शिवेंद्रराजे म्हणाले की, सातारा शहरातील रस्त्यांची कामे मार्गी लावण्यासाठी भरीव निधी उपलब्ध झाला आहे. सातारा शहरासह हद्दवाढ भागातील विविध विकासकामांना देखील कोट्यवधींचा निधी मंजूर झाला आहे. त्यामुळे नारळफोड्या गॅंगच्या बडबडीकडे लक्ष न देता मी माझी कामे करत राहणार आहे.


नगरपालिकेला भ्रष्टाचाराचे कुरण बनवले:आ. शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, सातारकरांनी मोठ्या विश्वासाने पालिकेची सत्ता विरोधकांच्या हाती दिली. परंतु, सत्ताधाऱ्यांनी पालिकेला भ्रष्टाचाराचे कुरण बनवून सातारकरांचा विश्वास धुळीस मिळवला. नगरपालिकेतील भ्रष्टाचार सातारकर उघड्या डोळ्यांनी पाहत होते. सत्ता नसतानाही सातारा शहर आणि हद्दवाढ भागासाठी आपण कोट्यवधीचा निधी आणला.


भ्रष्ट कारभाराचा घडा भरला :सत्ता असो वा नसो, सातारा शहराचा विकास करणे, नागरिकांचे प्रश्न सोडवणे हे माझे कर्तव्य आहे आणि हे कर्तव्य पार पाडण्यात मी कधीही कमी पडलो नाही, असे सांगून आ. शिवेंद्रराजे म्हणाले, सातारकरांचा विश्वासघात करणाऱ्या सत्ताधाऱ्यांच्या भ्रष्ट कारभाराचा घडा भरला आहे. सातारकर त्यांना योग्य धडा शिकवतील. यावेळी माजी नगराध्यक्ष अशोक मोने, अमोल मोहिते, जयेंद्र चव्हाण, अविनाश कदम, जयवंत भोसले, भालचंद्र निकम, धनंजय जांभळे, अंजली कुलकर्णी, अशोक गोडबोले यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

तर महाराष्ट्र सोडून जावे: ज्यांना औरंगजेब प्रिय असेल तर त्यांनी महाराष्ट्र सोडून निघून जावे, असा इशारा शिवेंद्रराजेंनी दिला आहे. एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांच्या औरंगाबादच्या नामांतराविरोधातील उपोषणात औरंगजेबाचे छायाचित्र झळकविण्यात आले होते. त्यावर शिवेंद्रराजे आक्रमक झाले आहेत.

उदात्तीकरण करणाऱ्यांचा निषेध : एमआयएमच्या सभेतील छायाचित्र प्रकरणावर बोलताना आमदार शिवेंद्रराजे म्हणाले, लाखो हिंदू लोकांची कत्तल आणि महाराष्ट्रातील धार्मिक स्थळे उद्धवस्त करणाऱ्या औरंगजेबाचे छायाचित्र झळकवून उदात्तीकरण करणाऱ्यांचा मी निषेध करतो. संबंधित कार्यकर्त्यांवर ताबडतोब देशद्रोहाचे गुन्हे दाखल करावेत, अशी महाराष्ट्रातील जनतेच्या वतीने माझी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी आहे.

हेही वाचा:IPL 2023 : रोहित शर्माची फॉर्ममध्ये वापसी, ठोकले शानदार अर्धशतक

ABOUT THE AUTHOR

...view details