महाराष्ट्र

maharashtra

पुण्यातला जैविक कचरा आणून सातारकरांच्या जीवाशी खेळू नका, आमदार शिवेंद्रराजेंचा इशारा

By

Published : Jun 16, 2020, 5:15 PM IST

सातारा शहरानजीकची उपनगरे, काही गावांतील कचरा सोनगाव कचरा डेपोमध्ये टाकण्यासाठी नगरपालिका आडकाठी आणत असते. असे असताना पुण्यातील धोकादायक जैविक कचरा सोनगाव कचरा डेपोमध्ये येतो आणि नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्‍न निर्माण होतो, ही बाब गंभीर असून प्रकार थांबवून सातारकरांच्या आरोग्याबाबत सतर्क रहावे, अशी सूचना शिवेंद्रसिंहराजे यांनी केली आहे.

आमदार शिवेंद्रराजे
आमदार शिवेंद्रराजे

सातारा - राज्यात पुणे आणि मुंबईमध्ये कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळत असताना पुण्यातील जैविक कचरा सातारा नगरपालिकेच्या कचरा डेपोत आणला जातो आणि सातारकरांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार होतो. ही संतापजनक बाब आहे. सातारकरांच्या आरोग्याबाबत कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिला आहे.

याबाबत शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, सातार्‍यातही कोरोनाचा प्रादुर्भाव मोठा आहे. असे असताना पुणे महानगरपालिकेतील जैविक कचर्‍याचे दोन डंपर सातारा कचरा डेपोत येतात. सोनगांव कचरा डेपोत दिवसाला १०० किलो विघटन क्षमता असताना तब्बल ४-५ टन जैविक कचरा सातार्‍यात आणला जातो, ही बाब अत्यंत चुकीची आणि नागरिकांच्या आरोग्यासाठी घातक आहे. सातारा पालिका प्रशासनाने हा प्रकार का केला, याबाबत नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष यांना तरी माहिती आहे का? मुख्याधिकार्‍यांनी मनमानी कारभार करुन नागरिकांच्या जीवाशी खेळू नये, असे त्यांनी म्हटले आहे.

पुण्यातल्या जैविक कचर्‍याची विल्हेवाट लावण्यासाठी पिंपरी- चिंचवड, लोणावळा अथवा अन्य नजीकच्या नगरपालिका आहेत. असे असताना हा कचरा सातार्‍यात आला कसा, यासाठी नगर पालिकेने परवानगी दिली होती का? मुख्याधिकार्‍यांनी यासाठी परवानगी दिली कशी? असे अनेक प्रश्‍न निर्माण झाले आहेत. सातारा शहरानजीकची उपनगरे, काही गावांतील कचरा सोनगाव कचरा डेपोमध्ये टाकण्यासाठी नगरपालिका आडकाठी आणत असते. असे असताना पुण्यातील धोकादायक जैविक कचरा सोनगाव कचरा डेपोमध्ये येतो आणि नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्‍न निर्माण होतो, ही बाब गंभीर आहे. कोणीही काहीही टाकावे यासाठी सातारा हे डंपींग गाऊंड आहे काय, असा संतापजनक सवाल शिवेंद्रसिंहराजे यांनी उपस्थित केला आहे.

कोरोनामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण असताना जैविक कचरा आल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. सातारकरांसह आसपासच्या गावातील लोकांना धोका होवू शकतो. पालिका प्रशासनाने तातडीने हा प्रकार थांबवून सातारकरांच्या आरोग्याबाबत सतर्क रहावे, अशी सूचना शिवेंद्रसिंहराजे यांनी केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details