सातारा :आगामी निवडणूकांमुळे सध्या राज्यातील राजकीय वातावरण हे तापत आहे. सर्व पक्ष आपपाल्या परीने प्रयत्न करत आहेत, त्यासाठी सभा मेळावे घेत आहेत.सातारा-जावळी विधानसभा मतदारसंघात शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचा शेतकरी मेळावा आणि जाहीर सभेचा कार्यक्रम होणार आहे. त्यासाठी शरद पवारांनी ७ जून ही तारीख दिली आहे. आगामी विधानसभा आपण सातारा-जावळी मतदारसंघातून लढणार असून निवडणुकीची ही बांधणी आहे. आमदार शिवेंद्रराजे भोसले यांना पाडूनच मी रिटायरमेंट घेणार आहे, असे आव्हान राष्ट्रवादीचे नेते दीपक पवार यांनी दिले आहे.
साताऱ्यातून शरद पवार जरी निवडणुकीला उभे राहिले तरी आम्ही त्यांना पाडू- रवी ढोणे, माजी बांधकाम सभापती, सातारा नगरपरिषद
सातारा-जावळीतील वातावरण तापले :दीपक पवारांच्या आव्हानाला प्रति आव्हान देत शिवेंद्रराजेंच्या कार्यकर्त्यांनी शरद पवार यांनाच चॅलेंज केले आहे. राष्ट्रवादीच्या अध्यक्षांनाच आव्हान दिल्यामुळे राजकीय वातावरण तापणार आहे. मी फक्त निवडणुकीसाठी जावळी तालुक्यात येत नसतो, तर मी इथलाच आहे. या मातीशी माझी नाळ जोडलेली आहे. आतापर्यंत जावळीत सर्व काही चांगले होते, म्हणून फारसे लक्ष देत नव्हतो. मात्र, यापुढे जावळी तालुक्यात यावे लागेल. कारण माझ्या पाठीशी शरद पवार यांचा आशीर्वाद आहे, असा सूचक इशारा शशिकांत शिंदे यांनी शिवेंद्रराजे भोसले यांना दिला होता. त्यानंतर दोघांमध्ये दरी वाढली होती. मात्र, बाजार समिती निवडणुकीत दोन्ही नेते एकत्र आले.
शशिकांत शिंदे कोरेगावातूनच लढणार :राष्ट्रवादीचे विधान परिषदेचे आमदार शशिकांत शिंदे हे जावळी तालुक्याचे सुपूत्र आहेत. जावळी आणि कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे ते आमदार राहिले आहेत. कोरेगाव मतदारसंघातून त्यांनी दोनवेळा विजय मिळवला होता. तत्पूर्वी ते जावळीचे आमदार होते. २०१९ मध्ये शिवसेनेच्या महेश शिंदे यांच्याकडून त्यांचा पराभव झाला. त्यानंतर राष्ट्रवादीने त्यांना विधानपरिषदेवर संधी दिली.