सातारा- पाटणचे आमदार तथा राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई आणि कोरेगावचे आमदार महेश शिंदे हे शिवसेनेचे दोन्ही आमदार 'नॉट रिचेबल' आहेत. त्यामुळे सातारा जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. विद्यमान गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांचे नाराज मंत्री एकनाथ शिंदेसोबत जाणे, हा पाटण तालुक्यासाठी राजकीय भूकंप ठरला आहे. पाटण तालुका भूकंपप्रवण मानला जातो. लहान-मोठ्या भूकंपाचे हादरे नेहमीच बसतात. परंतु, आजच्या राजकीय भूकंपाची कंपने मुंबईपर्यंत जाणवली.
2004 ला पहिल्यांदा विजयी -पाटणचे विद्यमान आमदार तथा राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई हे संघर्षातून विधीमंडळात पोहोचले आहेत. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांच्या विरोधात 2004 मध्ये ते पहिल्यांदा निवडून आले. त्यानंतर 2009 ला पराभूत झाले. मात्र, 2014 आणि 2019 च्या दोन विधानसभा निवडणुकीत सलग विजयी झाले. तसेच राज्याच्या मंत्रीमंडळात गृहराज्यमंत्रीपदही मिळाले. अखेरच्या क्षणी त्यांचा मंत्रीमंडळात समावेश झाला. ते शिवसेनेचे आमदार असले तरी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप या तिन्ही पक्षातील प्रमुख नेत्यांशी त्यांचा दोस्ताना आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याही ते मर्जीतील आहेत. राजकीय घडामोडींच्या अनुषंगाने त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, मोबाईल 'नॉट रिचेबल' आहे.