सातारा - जालना शहरातून बेपत्ता झालेले लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे ( Jalna ACB ) पोलीस निरीक्षक संग्राम ताटे ( Police Inspector ) हे 13 दिवसांनी सातारा जिल्ह्यातील पारगाव-खंडाळा येथे जुना टोलनाका परिसरात बेशुद्धावस्थेत सापडले. पोलिसांनी त्यांना शिरवळमधील खासगी रूग्णालयात दाखल केले होते. उपचारानंतर त्यांना भावाच्या ताब्यात देण्यात आले. भावाबरोबर ते तारूख (ता. कराड) या आपल्या मूळ गावी गेले आहेत.
काही दिवस होते उपाशीपोटी -पोलीस निरीक्षक संग्राम ताटे हे दोन दिवस सातारा जिल्ह्यातील खंडाळा येथील जुना टोलनाका परिसरात होते. बेशुद्धावस्थेत ते आढळल्याने नागरीकांनी ही माहिती खंडाळा पोलिसांना दिली. खंडाळ्याचे पोलीस निरीक्षक महेश इंगळे यांच्या सुचनेनुसार उपनिरीक्षक पांगारे, पोलीस शिपाई पिसाळ यांनी केलेल्या तपासात ते जालना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे बेपत्ता झालेले पोलीस निरीक्षक संग्राम ताटे असल्याचे निष्पन्न झाले. काही दिवस उपाशीपोटी असल्यामुळे ते अशक्त होते. त्यामुळे त्यांना उपचारासाठी शिरवळमधील खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले होते.
जालना पोलीस साताऱ्यात दाखल -खंडाळा पोलिसांनी जालना येथे नोंद असलेल्या मिसिंगचा तपास करणाऱ्या महेश टाक यांना संग्राम ताटे यांच्या संदर्भातील माहिती कळवून त्यांना बोलावून घेतले. जालना पोलिसांचे पथक येथे आल्यानंतर संग्राम ताटे यांना त्यांच्या भावाच्या स्वाधीन करण्यात आले. त्यानंतर संग्राम ताटे आपल्या भावाबरोबर तारूख (ता. कराड) या मूळ गावी गेले आहेत.
शिरवळच्या कंपनीतील युवकांनी केली मदत- पोलीस निरीक्षक संग्राम ताटे हे मूळचे तारूख (ता. कराड) येथील आहेत. ते जालना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक आहेत. दि. 2 फेब्रुवारीला बाहेर जाऊन येतो, असे पत्नीला सांगून जालनातून घराबाहेर पडले होते. त्यानंतर 13 दिवसांनी ते साताऱ्यातील खंडाळा हद्दीत बेशुद्धावस्थेत सापडले. तांबवे (ता. कराड) ही ताटे यांची ही सासरवाडी आहे. तांबवे गावातील अनेक तरूण शिरवळ एमआयडीसीत नोकरीला आहेत. संग्राम ताटे यांच्या संदर्भातील माहिती मिळताच त्यांनीही घटनास्थळ गाठले. तसेच दवाखान्यात नेण्यासाठी पोलिसांना मदत केली.
हेही वाचा -VIDEO : कोयना जलाशयात धुक्याची दुलई; पाहा, डोळ्यांचे पारणे फेडणारे सुंदर दृश्य