कराड (सातारा)- माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या व्हायरल झालेल्या क्लिपचा विपर्यास केला जात असल्याचे मत पाटणचे शिवसेनेचे आमदार, राज्याचे गृहराज्यमंत्री शंभुराजे देसाई यांनी व्यक्त केले आहे. 'मी मंत्री मंडळात नाही. सरकारपण आमचे नाही. हे सरकार शिवसेनेचे आहे', असे पृथ्वीराज चव्हाण म्हणत असल्याचे त्यात ऐकायला मिळत आहे. तर मुख्यमंत्री शिवसेनेचा असून हे महाविकासआघाडीचे सरकार असल्याचे शंभुराजे म्हणाले.
'पृथ्वीराजबाबांच्या ''त्या'' वक्तव्याचा विपर्यास केला जातोय' - prithviraj chavan audio clip
सरकार आमचे नाही, शिवसेनेचे आहे, हे पृथ्वीराज चव्हाण यांचे वक्तव्य राजकीय वर्तुळात चर्चेत आले आहे. याबाबत पाटणचे शिवसेनेचे आमदार, राज्याचे गृहराज्यमंत्री शंभुराजे देसाई यांनी व्हायरल झालेल्या क्लिपविषयी विपर्यास केला जात असल्याचे म्हटले आहे.
माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान आमदार पृथ्वीराज चव्हाण यांना एका व्यक्तीने निधीच्या संदर्भाने फोन केला. विभागीय आयुक्तांकडे वर्ग केलेला निधी परत गेला आहे. चार शेतकर्यांनी आत्महत्या केल्या आहेत. निधी मिळण्यासाठी आपण प्रयत्न करावेत, अशी विनंती फोन करणार्याने आमदार चव्हाण यांना केली. त्यावर बोलताना पृथ्वीराज चव्हाण म्हणतात, मी आज मंत्रिमंडळात नाही. सरकारही आमचे नाही. शिवसेनेचे सरकार आहे. कोरोना संकटामुळे निधी परत घेतलेला आहे. मी मंत्रिमंडळाकडे शिफारस करेन. परंतु, अर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे होईल, असे वाटत नाही. त्यामुळे नव्याने निर्णय घ्यावा लागेल, असेही पृथ्वीराज चव्हाण त्या क्लीपमध्ये म्हणत आहेत.
सरकार आमचे नाही, शिवसेनेचे आहे, हे पृथ्वीराज चव्हाण यांचे वक्तव्य राजकीय वर्तुळात चर्चेत आले आहे. काही दिवसांपूर्वी पृथ्वीराज चव्हाण यांनी देशातील देवस्थान ट्रस्टकडील सोने सरकारने ताब्यात घ्यावे, असे वक्तव्य केले होते. त्यावेळीही मोठा गदारोळ माजला होता. आता पुन्हा पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्यात शिवसेनेचे सरकार आहे, असे वक्तव्य करून नव्या वादाला तोंड फोडले आहे. मात्र, शंभुराजे देसाई यांनी व्हायरल झालेल्या क्लिपविषयी विपर्यास केला जात असल्याचे म्हटले आहे.