सातारा -आदित्य ठाकरे वरळीतून निवडून येण्यासाठी शिवसेनेला दोन दिग्गज नेत्यांना विधान परिषदेवर घ्यावे लागले. तेच त्या आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना आव्हान देणे हस्यास्पद आहे. मुख्यमंत्र्यांचे राहू द्या, तुम्ही पाटण विधानसभा मतदार संघात येऊन निवडून येऊन दाखवा, असे आव्हान उत्पादन शुल्क मंत्री तथा सातार्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी आदित्य ठाकरेंना दिले आहे. आदित्य ठाकरेंनी काल (शुक्रवारी) मुख्यमंत्र्यांना वरळी मतदारसंघातून निवडून येऊन दाखविण्याचे आव्हान दिले होते. त्यासंदर्भात प्रसार माध्यमांशी बोलताना शंभूराजेंनी प्रतिआव्हान दिले.
निवडून येण्यासाठी दोघांना आमदारकी :आदित्य ठाकरे गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने टीका करत आहेत. मुख्यमंत्र्यांना वरळीतून निवडून येण्याचे आव्हान देणार्या आदित्य ठाकरेंना निवडून येण्यासाठी शिवसेनेला सुनील शिंदे, सचिन अहिर या दिग्गजांना विधान परिषदेवर घ्यावे लागले होते. स्वत: निवडणून येण्यासाठी दोन आमदारक्या द्याव्या लागल्या. त्यांनी मुख्यमंत्र्यांना आव्हान देणे हास्यास्पद असल्याचे शंभूराज देसाई म्हणाले.
आव्हान देण्याची भाषा करू नये :पुन्हा निवडणुक लावायची तयारी असेल तर आदित्य ठाकरेंनी पाटण विधानसभा मतदार संघात येऊन विधानसभेची निवडणूक लढवावी दाखवावे. ज्यांच्या मागे 50 आमदार आणि 13 खासदार आहेत, त्यांना आव्हान देण्याची भाषा करु नये, असा सूचक इशारा शंभूराज देसाईंनी आदित्य ठाकरेंना दिला.
अजित पवार मुख्यमंत्री झाले असते, पण... महाविकास आघाडी स्थापन झाली त्यावेळी आमदारांची संख्या जास्त असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचा मुख्यमंत्री झाला असता. परंतु, तसे होऊ शकले नाही. आमदारांच्या संख्याबळावर त्यावेळी अजितदादा मुख्यमंत्री झाले असते तर कदाचित राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढलेला पहायला मिळाला असता, अशी गुगली देखील शंभूराज देसाईंनी टाकली.
मुख्यमंत्रीपद मिळायला पाहिजे होते :मुख्यमंत्रीपद जाण्यासाठी राष्ट्रवादीचे वरीष्ठ नेतेच जबाबदार असल्याचे वक्तव्य अजित पवार यांनी केले आहे. तो धागा पकडून शंभूराज देसाई म्हणाले, अजित पवारांचे म्हणणे योग्य आहे. ज्या पक्षाचे आमदार जास्त त्या पक्षाचा मुख्यमंत्री, असे महाविकास आघाडीत देखील ठरले असावे. त्यांच्या सुत्राप्रमाणे विचार केला तर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मुख्यमंत्री पद मिळायला पाहिजे होते. ते का मिळू शकले नाही, तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे.