सातारा - गृह राज्य मंत्री शंभूराज देसाई यांनी आज (मंगळवार) शहरात दुचाकीवरून जाऊन सातारा शहर पोलीस ठाण्यात अधिकारी-कर्मचाऱ्यांची झडती घेतली.
गृह राज्य मंत्र्यांनी अचानक पोलीस ठाण्यास भेट देऊन पोलिसांची घेतली झाडाझडती प्रश्नांची केली सरबत्ती -
मंगळवारी सकाळी गृह राज्य मंत्री शंभूराज देसाई यांनी अचानक आपल्या निवासस्थानातून मोटारसायकल काढत पोवई नाक्यावरून, कर्मवीर पथावरुन थेट शहर पोलीस ठाणे गाठले. गृहराज्यमंत्र्यांना साक्षात पोलीस ठाण्यात पाहिल्यानंतर उपस्थित कर्मचाऱ्यांची भांबेरी उडाली. मंत्री देसाई यांनी कोण अधिकारी ड्युटीवर आहेत, कोण कोणत्या बंदोबस्ताला गेले आहे. पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी आलेल्या तक्रारदाराची तक्रार काय आहे, अशा प्रश्नांची सरबत्ती केली.
कर्मचाऱ्यांची घेतली झाडाझडती -
ड्युटीवर असतानाही टोपी न घालणाऱ्या कर्मचाऱ्याला त्यांनी फैलावर घेतले. त्यानंतर वाढत्या गुन्ह्यांबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना आवश्यक सूचनाही केल्या. सातारा शहरात गेल्या काही दिवसात गुन्ह्यांचे प्रमाण वाढले आहे. काही गंभीर गुन्ह्यातील संशयित पोलिसांना अद्याप मिळाले नाहीत. त्यासंदर्भात प्रसारमाध्यमांतून पोलीस प्रशासन टिकेचे धनी होत आहे. त्याकडेही शंभुराज देसाई यांनी पोलीस अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले.
हेही वाचा -ईटीव्ही विशेष : नवाब मलिक बनले महाविकास आघाडीचे 'हिरो'!