सातारा - भोसे (ता. कोरेगाव) येथील शहीद जवान विपुल इंगवले (Martyr Vipul Ingavale) यांच्या पार्थिवावर सोमवारी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. पोलीस दल व भारतीय सैन्य दलाच्या तुकडीने हवेत बंदुकींच्या फैरी झाडून तसेच अंतिम बिगुल वाजवून शहीद जवानास मानवंदना दिली.
विपुल इंगवलेंवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार सियाचीनमध्ये कार्यरत असताना वीरमरण - भोसे (ता. कराड) येथील जवान विपुल दिलीप इंगवले (वय 26) हे सियाचीन येथे ग्लेशियरमध्ये (बर्फाच्छादित प्रदेश) कार्यरत असताना हीम दंशामुळे त्यांच्या प्रकृतीवर प्रतिकूल परिणाम झाला. त्यांच्यावर सियाचीनमधील कमांड हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना त्यांना वीरमरण आले. या घटनेमुळे भोसे परिसरावर शोककळा पसरली होती. 2016 मध्ये विपुल इंगवले हे भारतीय सैन्यदलात भरती झाले होते. गोवा येथे सैनिकी प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांची सिग्नल रेजिमेंटमध्ये नियुक्ती झाली होती. सुमारे वर्षभरापासून सियाचीन ग्लेशियरमध्ये ते कार्यरत होते.
विपुल इंगवलेंवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार विपुले होते कॉलेजचे बेस्ट कँडेट - कोरेगाव येथील डी. पी. भोसले कॉलेजमध्ये शिकत असताना विपुल इंगवले हे एनसीसीचे बेस्ट कँडेट होते. एनसीसीच्या माध्यमातून त्यांना दिल्ली येथील आरडी परेडमध्ये सहभागी होण्याचा मानही मिळाला होता. 2019 साली लॉकडाउनमध्ये त्यांचा विवाह झाला होता. येत्या 24 जून रोजी त्यांच्या लग्नाचा वाढदिवस होता. या सर्व आठवणींना उजाळा मिळताच भोसे ग्रामस्थांसह विपुल यांच्या मित्र परिवाराच्या देखील अश्रूंचा बांध फुटला. विपुल यांचे पार्थिव गावात दाखल होताच त्यांच्या कुटुंबीयांनी केलेला आक्रोश उपस्थितांचे काळीज पिळवटून टाकणारा होता.
विपुल इंगवलेंवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार विपुल इंगवलेंना मान्यवरांची मानवंदना - यावेळी खासदार श्रीनिवास पाटील, आमदार शशिकांत शिंदे, आमदार महेश शिंदे, कोरेगावच्या प्रांताधिकारी ज्योती पाटील, गटविकास अधिकारी क्रांती बोराटे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी विजयकुमार पाटील यांनी शहीद जवान विपुल इंगले यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून मानवंदना दिली. शहीद विपुल इंगले यांचे बंधू विशाल यांनी पार्थिवाला मुखाग्नी दिला. यावेळी लष्करातील आजी, माजी अधिकारी, सैनिक, शासकीय अधिकारी आणि भोसे परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हेही वाचा -Shaheed Diwas 2022 : हुतात्मा शिवराम हरि राजगुरु यांच्या ९१ व्या बलिदान दिनानिमित्त जन्मस्थळावर ध्वजारोहण करून अभिवादन