सातारा -16 चक्र मराठा बटालियनचे जवान संदीप सावंत यांना काश्मिरमध्ये दहशतवाद्यांशी लढताना बुधवारी पहाटे वीरमरण आले. काश्मीर खोर्यातील नौशेरा विभागात ही घटना घडली. संदीप सावंत यांचे पार्थिव सकाळी साडेआठ वाजता कराडच्या विजय दिवस चौकात दाखल झाले. याठिकाणी पार्थिवाला मानवंदना देऊन अंत्ययात्रेला सुरुवात झाली. त्यानंतर त्यांच्यावर दुपारी 1:15 च्या सुमारास लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
लष्करी इतमामात हुतात्मा संदीप सावंत यांना अखेरचा निरोप हेही वाचा-बिपिन रावत यांच्या नावे बनावट पत्र होतेय व्हायरल, लष्काराचा सतर्कतेचा इशारा
शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह हजारो कराडकर संदीप सावंत यांच्या अंत्ययात्रेत सहभागी झाले होते. संदीप सावंत 'अमर रहे, वंदे मातरम, भारत माता की जय', अशा घोषणा अंत्ययात्रेत दिल्या. अनेक नागरिक अंत्ययात्रेत सहभागी झाले होते. तसेच संदीप सावंत यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा देखील नागरिकांनी गर्दी केली होती.
नववर्षाच्या पहाटे संदीप सावंत यांच्या गस्ती पथकाला नियंत्रण रेषेजवळ जंगलातील दाट झाडीत काही हालचाली दिसल्या. सावंत यांच्यासह पथकातले सगळे सहकारी संभाव्य धोक्यासाठी सज्ज झाले. यावेळी दहशतवादी घुसखोरी करत असल्याचे त्यांना दिसले. दाट धुके व कडाक्याच्या थंडीमुळे दहशतवाद्यांची नेमकी संख्या समजू शकली नाही. मात्र, संदीप सावंत आणि त्यांच्या पथकाने दहशतवाद्यांशी दोन हात करण्यास सुरुवात केली. त्यावेळी दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात संदीप सावंत आणि गोरखा रायफल्सचे अर्जुन थापा या दोघांना वीरमरण आले. या दोघांनी दाखवलेले शौर्य देश कधीही विसरणार नाही. त्यांच्या बलिदानाची देशाला कायम जाणीव राहिल अशा शब्दात कर्नल देवेंद्र आनंद यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या.
संदीप सावंत शिक्षण व माहिती -
संदीप सावंत भारतीय सैन्यदलात 9 ते 10 वर्षापूर्वी भरती झाले होते. त्यांचा विवाह 3 वर्षापूर्वी झालेला असून त्यांना 2 महिन्यांची एक मुलगी आहे. तिचे नांव ठेवण्याचा कार्यक्रम गेल्या महिन्यात गावी घेण्यात आला होता, तेव्हा संदीप गावी आले होते. संदीप यांचे शिक्षण प्रेमलाकाकी चव्हाण माध्यमिक विद्यालय, वियनगर येथे झाले असून महाविद्यालयीन शिक्षण बापूजी साळुंखे महाविद्यालय, कराड येथे झाले आहे. संदीप यांचे कुटुंब एकत्रित असून त्यांना पत्नी, 2 महिन्यांची एक मुलगी, आई- वडिल, दोन चुलते- काकी, एक सख्खा भाऊ, दोन चुलत भाऊ, दोन चुलत बहिणी असा मोठा परिवार आहे. आज विजयनगर येथील पार्वती लॉन्स समोरील विट्टभट्टी येथील जागेत शासकीय इतमातात अंत्यसंस्कार करण्यात आले.