सातारा Maratha Reservation: मराठा आरक्षणासाठी शहाजी दांडगे तसंच ज्ञानेश्वर गुंड (पंढरपूर) या दोन मराठा तरुणांनी स्वतःच्या रक्तानं लिहिलेलं पत्र, आज खासदार उदयनराजे भोसले यांना दिलंय. यावेळी उदयनराजे भोसलेंनी त्यांच्या तळमळीचं कौतुक केलंय. तसंच दर दहा वर्षांनी जनगणना झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केलीय. जोपर्यंत जनगणना होत नाही, तोपर्यंत निवडणुका घेऊ नका, अशा शब्दांत उदयनराजे भोसले यांनी सरकारला सुनावलं आहे.
तेढ निर्माण केल्यास उद्रेक होणारच :आज या तरूणांनी रक्तानं पत्र लिहिलं आहे. समाजात तेढ निर्माण केल्यास उद्रेक होणारच असं मत भोसले यांनी यावेळी मांडलं. आरक्षण प्रश्नाचं राजकारण करत असला तर मग जनगणना होत नाही, तोपर्यंत निवडणुकही घेऊ नका. सगळ्या जातीतील लोकांना न्याय द्या. केवळ एक विशिष्ट जात पकडून चालू नका, असा सल्लाही उदयनराजेंनी राज्य सरकारला दिलाय.
अन्यथा मतदार पायाखाली घेतील :स्वत:च्या राजकीय महत्वकांक्षेसाठी आम्ही सर्वोच्च न्यायालयातून हे आणलं ते आणलं, असं सांगणं योग्य नाही. लोकशाहीत मतदार राजा असतो. त्याला सन्मानानं वागवा. अन्यथा तुम्हाला ते पायाखाली घ्यायला मागं, पुढं पाहणार नाहीत. आरक्षण प्रश्नावरुन आत्महत्या होत असेल, तर याला सरकारचं जबाबदार असेल, असा इशारा खासदार उदयनराजे भोसले यांनी दिला.