सातारा - दुष्काळी माण खटाव तालुक्यात बुधवारी रात्री पावसाने जोरदार हजेरी लावली. पावसाच्या सरींसोबत मोठ्या प्रमाणात वारा सुटल्याने अनेक ठिकाणी घरांचे पत्रे उडून गेले आहेत. तर, दहिवडी नगरपंचायतीसमोर असणाऱ्या वृक्षांची मोठी पडझड झाली आहे. यामध्ये 15 ते 20 मोठी वृक्ष रस्त्यावर पडली.
साताऱ्यात वादळी वाऱ्यासह पाऊस, शेकडो झाडे रस्त्यावर उन्मळून पडली
दुष्काळी माण खटाव तालुक्यात बुधवारी रात्री पावसाने जोरदार हजेरी लावली. पावसाच्या सरींसोबत मोठ्या प्रमाणात वारा सुटल्याने अनेक ठिकाणी घरांचे पत्रे उडून गेले आहेत. तर, दहिवडी नगरपंचायतीसमोर असणाऱ्या वृक्षांची मोठी पडझड झाली आहे.
काही ठिकाणी विजेच्या खांबावरती झाडे पडल्याने पोल मोडले आहेत. शिवाय इतर ठिकाणीदेखील मोठ्या प्रमाणात वृक्ष रस्त्यावर पडले आहेत. त्यामुळे, रात्रीपासून शहरातील अनेक भागांत वीज खंडित झाली आहे. आज सकाळी दहिवडी नगरपंचायतचे नगराध्यक्ष सतीश जाधव व मुख्यधिकरी संदीप घार्गे यांनी याची दखल घेत महावितरण विभागाला सूचना देऊन तत्काळ काम सुरू केले आहे.
रस्त्याच्या बाजूला असणारी धोकादायक झाडे तत्काळ बाजूला करून झाडाच्या फांद्या तोडण्याचे कामही सुरू करण्यात आले आहे. महावितरण विभागाने काम सुरू केले असले तरी आज दिवसभर वीज खंडित राहणार असल्याचे महावितरण विभागामार्फत सांगण्यात आले आहे.