सातारा- सांगली, कोल्हापूरला महापुराचा तडाखा बसला होता. यात अनेकांचे संसार उद्धवस्थ झाले आहेत. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी अनेक हात समोर येत आहेत. मात्र, मुक्या जनावरांकडे दुर्लक्ष होत आहे. यासाठी म्हसवड येथील माणदेशी फाउंडेशनने पुढाकार घेत कुरुंदवाड शहरातील अनेक जनावरे परिस्थिती व्यवस्थित होत नाही तोपर्यंत दत्तक घेतली आहेत. यावेळी जनावरांसाठी पेंड, ओला चारा, कुट्टी देण्याचे जाहीर करत त्याठिकाणी जात पशुखाद्याचे वाटपही सुरू केले आहे, माणेदेशी फाउंडेशनच्या या मदतीचे शेतकऱ्यांकडून कौतुक होत आहे.
पूरग्रस्तांसाठी धावले दुष्काळी भागातील 'माणदेशी फाऊंडेशन' कायम दुष्काळाशी सामना करणाऱ्या माण तालुक्यात यंदाही दुष्काळाची छाया आहे. दुष्काळी जनतेला दिलासा देण्यासाठी माण तालुक्यात पिण्याच्या पाण्याचे आजही १०० हुन अधिक टँकर सुरू आहेत, तर येथील शेतकऱ्यांच्या जनावरांसाठी जवळपास ८८ चारा छावण्या सुरू आहेत. म्हसवड शहरातील माणदेशी फाउंडेशनच्यावतीने जानेवारी महिन्यांपासूनच सुमारे ७ हजार जनावरांची चारा छावणी चालवली जात आहे. तालुक्यात अशी भीषण परिस्थिती असताना पुरामुळे कोल्हापूर व सांगली जिल्ह्याचे अतोनात नुकसान झाले आहे. या जिल्ह्यातील काही गावांना महापुराने वेढा दिल्याने नागरिकांचे हाल सुरू आहेत.
महापूर ओसरल्यावर महापुरातील लोकांसाठी विविध ठिकाणांहून मदतीचा ओघ सुरू आहे. तसेच गावातील मुक्या जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्न गंभीर प्रश्न बनलो होता. तेव्हा म्हसवड येथील माणदेशी फाउंडेशनने तात्काळ कुरुंदवाड येथे सर्व्हे करण्यात आला व त्या गावातील जनावरांसाठी त्वरीत पेंढ व रहिवाशांसाठी ५ किलो गव्हाचे पीठ देण्यात आले.
यावेळी बोलताना माणदेशी फाउंडेशनच्या प्रमुख चेतना सिन्हा म्हणाल्या की, माण तालुक्यात सध्या पिण्याच्या पाण्याचा व जनावरांच्या चाऱ्यांचा मोठा गंभीर प्रश्न आहे. त्यासाठी शासनस्तरावरून पाण्याचे टँकर व जनावरांच्या चारा छावण्या सुरू आहेत. दुष्काळाचे हे संकट माण तालुक्यातील जनतेला नवे नसले तरी अद्यापही या तालुक्यात पाऊसच पडला नाही. तालुक्यातील शेतकरीवर्ग हवालदिल झाला आहे. शेतकऱ्यांवर ओढवणाऱ्या दुष्काळाच्या अस्मानी संकटाचा अंदाज बांधून केवळ त्यांचे पशुधन जगावे यासाठी आम्ही माणदेशी फाउंडेशनच्यावतीने जानेवारी महिन्यातच जनावरांची चारा छावणी सुरू केली. ती अद्यापही सुरू आहे. या चारा छावणीत सध्या सुमारे ७ हजार जनावरे तर २ हजार शेतकरी निवासी राहत आहेत. मात्र, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात आलेला महापूर हा अत्यंत भयानक आहे. या महापुराने अनेकांचे संसार वाहुन गेले आहेत. अनेक शेतकऱ्यांची मुकी जनावरेही महापुराच्या पाण्यात वाहून गेली आहेत. आता महापूर ओसरला असला तरी त्या महापुराने दिलेल्या जखमा ओल्या आहेत.
या महापुरातील जनतेला दिलासा देण्यासाठी शासनाबरोबरच अनेक संस्था मदतीचा हात घेवून पुढे येत आहेत. ही वस्तुस्थिती असली तरी खरा प्रश्न आहे तो येथील मुक्या जनावरांचा. या महापुरात कुरुंदवाडकरांनी मोठे साहस दाखवत आपली जनावरे बिल्डिंगवर ठेवून त्यांचा जीव वाचवला आहे. या सर्व जनावरांना आम्ही दत्तक घेत असल्याचे चेतना सिन्हा यांनी सांगितले. त्यामुळे शेतकऱयांना एकप्रकारे हा दिलासाच आहे.