महाबळेश्वर: माकडाला चीप्स देताना पाय घसरून, पुण्यातील एक पर्यटक महाबळेश्वर (Mahabaleshwar) - प्रतापगड मुख्य घाट रस्त्यावरील शंभर फूट खोल दरीत पडला आहे. संदीप ओमकार नेहते (वय - 33, मूळ रा. मध्य प्रदेश, सध्या रा. बावधन, पुणे) असे त्याचे नाव आहे. महाबळेश्वर ट्रेकर्सच्या ( Mahabaleshwar Trekkers ) जवानांनी तीन तासांच्या प्रयत्नांनंतर त्याला दरीतून बाहेर काढण्यात यश आले आहे.
कठड्यावरून पर्यटक पडला दरीत - संदीप नेहते हे कुटुंबियांसह हरिहरेश्वर (जि. रायगड) येथून महाबळेश्वरला पर्यटनास येत होते. आंबेनळी घाट रस्त्यामार्गे येत असता, त्यांना जननी माता मंदिराच्या बाजुला दरीच्या कठड्यावर काही माकडे दिसली. ते गाडीतून उतरून माकडांना चिप्स खायला देण्यासाठी कठड्यावर उभे राहिले. कठड्यावरून पाय घसरल्याने ते शंभर फूट खोल दरीत कोसळले आहेत. माकडांना खायला देणे, या पर्यटकाच्या चांगलेच जीवावर बेतले आहे. परंतु, महाबळेश्वर ट्रेकर्सच्या जवानांमुळे ते बचावले आहेत.
ट्रेकर्सच्या जवानांमुळे वाचला जीव - पर्यटक दरीत पडल्याची माहिती मिळताच महाबळेश्वरचे पोलीस आणि महाबळेश्वर ट्रेकर्सचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी दाट धुके आणि संततधार पाऊस सुरू होता. तरीही जवानांनी खोल दरीत उतरून संदीप नेहते यांना सुखरूपरित्या दरीतून बाहेर काढले आहे. तसेच तातडीने त्यांच्यावर महाबळेश्वरच्या ग्रामीण रूग्णालयात प्राथमिक उपचार करून, पुढील उपचारासाठी सातारा जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.