सातारा- गुरे धुण्यासाठी गेलेल्या मामा-भाच्याचा मोरणा नदीत बुडून मृत्यू झाल्याची घटना पाटण तालुक्यातील सुळेवाडी येथे घडली आहे. अशोक शंकर कदम (रा. सोनवडे) आणि अनिकेत हरिबा चव्हाण (रा. जिंती, ता. पाटण), अशी त्यांची नावे आहेत. आठवडाभरात पाटण तालुक्यातील पाच जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे.
खोल डोहात सापडले मृतदेह
अशोक कदम हे गुरे धुण्यासाठी मोरणा नदीवर गेले होते. समवेत त्यांचा भाचा अनिकेत होता. सायंकाळी उशिरापर्यंत गुरे आणि अशोक व अनिकेत हे घरी परतले नाहीत. त्यामुळे कुटुंबीय आणि तरूणांनी रात्रभर नदीकाठी त्यांचा शोध घेतला. परंतु, दोघेही सापडले नाहीत. गुरुवारी सकाळी मोरणा नदीतील खोल डोहात त्यांचा शोध घेत असताना अशोक आणि अनिकेत यांचे मृतदेह सापडले.
मामाला भेटण्यासाठी दोन दिवसांपुर्वीच आला होता आजोळी
अशोक कदम हे अविवाहित होते. सहकारी संस्थेत ते रोजंदारीवर कामाला होते. तर भाचा अनिकेत हा बारावीत शिकत होता. तो मूळचा जिंती (ता. पाटण) गावचा होता. लग्न समारंभाच्या निमित्ताने मामाला भेटण्यासाठी दोन दिवसांपुर्वीच तो आजोळी आला होता. मात्र, मामा-भाच्यावर काळाने झडप घातल्याने सोनवडे आणि जिंती परिसरावर शोककळा पसरली आहे. एकुलत्या मुलाच्या मृत्यूने अनिकेतच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. या घटनेची माहिती मिळताच पाटणचे पोलीस निरीक्षक नितीन चौखंडे यांनी घटनास्थळी भेट दिली. दोन्ही मृतदेहांचे पाटण ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन झाले. त्यानंतर रात्री दोन्ही मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले.
हेही वाचा -इस्राईल-पॅलेस्टाईन वाद चिघळला; गाझामध्ये तोफ हल्ले सुरू, १००हून अधिक ठार