कराड (सातारा) - कोविड मृताच्या अंत्यसंस्कारासाठी प्रतिव्यक्ती 5 हजार रूपयांचे अनुदान मिळावे, अशी मागणी मलकापूर नगरपालिकेने नगरविकास मंत्र्यांकडे केली आहे. आतापर्यंत 300 कोविड मृतांवर नगरपालिकेने अंत्यसंस्कार केले आहेत. त्यासाठी 9 लाखांचा खर्च नगरपालिका फंडातून केला असल्याचेही नगरविकास मंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
सातारा जिल्हाधिकार्यांच्या सूचनेनुसार कोविड मृतांवरील अंत्यसंस्कारासाठी स्वतंत्र स्मशानभूमीची सोय करण्यात आली आहे. कृष्णा चॅरिटेबल ट्रस्ट, काले प्राथमिक आरोग्य केंद्र, उंडाळे ग्रामीण रूग्णालय तसेच येवती प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या अखत्यारित येणार्या गावांमधील कोरोनाने मृत्यू होणार्या नागरीकांवर पाचवडेश्वर येथे अंत्यसंस्कार करण्याची जबाबदारी मलकापूर नगरपालिकेवर सोपविण्यात आली आहे. त्यानुसार 300 व्यक्तींवर विनाशुल्क अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.
एका व्यक्तीवरील अंत्यसंस्काराचा खर्च 5 हजार रूपये आहे. त्यानुसार आतापर्यंत 9 लाख रूपये खर्च नगरपालिकेकडून करण्यात आला आहे. प्रशासन अथवा शासनाकडून कोणत्याही प्रकारचा निधी उपलब्ध झालेला नाही. मलकापूर नगरपालिकेला संकलित कर व पाणीपट्टी या व्यतिरिक्त कोणतेही उत्पन्नाचे साधन नाही. त्यामुळे नगरपालिकेवर कोविड रूग्णांवरील अंत्यसंस्काराच्या खर्चाचा बोजा पडत आहे. त्यामुळे कोरोनाबाधित मृत व्यक्तीवरील अंत्यसंस्कारासाठी प्रती व्यक्ती 5 हजाराचे अनुदान मिळावे, असे नगरविकास मंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.